उस्मानाबाद : डॉ. पद्मसिंह पाटील (Dr Padmasinha Patil) परिवाराने भाजप प्रवेशाची (BJP) घोषणा केल्यानंतर पाटील आणि राजे निंबाळकर परिवारातील सत्तासंघर्ष पेटताना दिसत आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर (Shivsena MP Omraje Nimbalkar) यांनी आक्रमकपणे बॅनरबाजी करत पाटील परिवारावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि पवनराजे निंबाळकर (Pavanraje Nimbalkar) यांचे फोटो असलेले बॅनर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. डॉ पाटील परिवाराला रावण आणि गाढवाची उपमा देत शिवसेनेचे खासदार ओमराजे यांनी खुलं चॅलेंज दिलं आहे.
‘जब तक ये खेल खतम नहीं होता अपुन इधरीच है’, ‘ज्याची लंका सोन्याची होती, तो धुळीला मिळाला कारण वाईट प्रवृत्तीचा शेवट वाईटच असतो’, ‘व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती सोबतचा संघर्ष चालूच राहील, काल आज आणि उद्यासुद्धा’, ‘वाघाचं कातडं पांघरुन गाढव कधी वाघ होत नसतात’ असे पोस्टर लावून निंबाळकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा जगजीतसिंह यांनी जनतेच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली होती. या मेळाव्यात आमदार राणा यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख करत या परिवाराने आपलं राजकीय ध्येय स्पष्ट केलं होतं. त्यानंतर खासदार ओमराजे यांनी शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत डॉ पाटील परिवाराला विरोध करणार असून त्यांच्या प्रवृत्तीला मूठमाती देणार असल्याचं जाहीर केलं होतं.
शरद पवार यांच्या कृपेने 40 वर्ष सत्ता भोगली, तो स्वार्थी पाटील परिवार त्यांचा होऊ शकला नाही तो भाजपचा व जनतेचा कसा काय होईल? असा सवाल उपस्थित करत आपला संघर्ष सुरुच राहणार असल्याचं ओमराजे म्हणाले होते. त्यांनतर आता या सोशल मीडियावरील पोस्ट समोर आल्या आहेत.
डॉ. पद्मसिंह पाटील आणि आमदार राणा जगजीतसिंह यांचा भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये भाजप प्रवेश अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दुपारी उस्मानाबाद शहरात येत असून ते जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेची आक्रमक भूमिका आणि स्थानिक भाजप नेत्यांची मनं ओळखून मुख्यमंत्री डॉ. पाटील परिवारावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नेत्यांच्या पळवापळवीनंतर राणा समर्थक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत.
शिवसेनेचा कायमच डॉ. पाटील परिवाराला विरोध
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डॉ. पाटील यांना पवनराजे हत्याकांडाप्रकरणी धारेवर धरलं होतं. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत त्यांच्यावर कडाडून टीकाही केली होती. उद्धव ठाकरे यांनी डॉ पाटील यांच्याविषयी मुसमुसलेला हत्ती आणि रेडा असे शब्द वापरत पवनराजे यांचे पुत्र ओमराजे यांना न्याय कधी मिळणार? असा प्रश्न विचारला होता. डॉ. पाटील सत्तेचा गैरवापर करत पुरावे नष्ट करतील आणि मोकाट सुटतील असा आरोपही उद्धव यांनी केला होता.
उद्धव ठाकरे ज्या ज्या वेळी उस्मानाबाद जिल्ह्यात येऊन प्रचार सभा घेतात, त्यावेळी ते डॉ पाटील परिवाराला पवनराजे हत्याकांड आणि इतर मुद्यांवरुन टार्गेट करतात. गोपीनाथ मुंडे यांनीही पवनराजे हत्याकांडानंतर ओमराजे यांना आधार दिला होता.
माणसं घेऊन परिवर्तन होत नसतं, जनतेची कामं करुन परिवर्तन होत असतं. तुम्ही परिवर्तन करायला जात आहात, उलट अधोगतीच होईल असा सल्ला शिवसेनेचे मंत्री तानाजीराव सावंत यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. गाढव असताना वाघाचे गोंघडं पांघरुन वाघाच्या काळपात शिराल तर जनता जागा दाखवेल असंही सावंत जाहीर भाषणात म्हणाले होते.
भाजप पक्षात कुणाला घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे, डॉ. पाटील परिवाराला आधी तिकीट तर मिळू दे, नंतर काय ते ठरवू, असे सूचक संकेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिवाकर रावते यांनी काल उस्मानाबादेत केले होते.
स्थानिक भाजपातही डॉ. पाटील यांच्याविरोधात घुसमट
डॉ. पद्मसिंह पाटील यांना सावंत आयोगात भ्रष्टाचाराचे आरोप स्पष्ट झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यावर पवनराजे दुहेरी हत्याकांडाचाही आरोप आहे. भ्रष्ट आणि डागाळलेल्या मंत्र्यांना भाजपात प्रवेश देणार नसल्याचं मुख्यमंत्री आणि अनेक नेत्यांनी जाहीर केलं होतं.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. पाटील परिवाराच्या विरोधात संघर्ष करत मोट बांधली होती. मात्र आता डॉ. पाटील भाजपवासी होणार असल्याने जनतेच्या दरबारात त्यांचा उदो उदो करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे स्थानिक भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे. भाजपचे अनेक नेते या पक्षप्रवेशावर बोलणं टाळत आहेत. त्यामुळे डॉ पाटील यांचा भाजपमधील संसार नक्कीच सुखाचा नसणार.
शिवसेनेचा डॉ पाटील परिवाराला होणार विरोध आणि स्थानिक भाजप नेत्यांच्या घुसमटीमुळे आगामी काळात परिवर्तनाची गणिते बिघडणार असल्याचा राजकीय अंदाज आहे.