जालना: आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सर्व हेवेदावे विसरुन एकत्र आले पाहिजे, असे आवाहन शिवसेनेचे परभणी खासदार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Jadav) यांनी केले. कार्यकर्त्यांमध्ये मानापमानाचे राजकारण रंगू नये म्हणून यापुढे जिल्ह्यातील शिवसेना शाखांच्या फलकांवर फक्त पक्षाचेच नाव असेल. जेणेकरून कोणीही नाराज होणार नाही, असे संजय जाधव यांनी म्हटले.
सोशल मीडियावार सध्या संजय जाधव यांच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये संजय जाधव कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही शिवसेनेला चांगले यश मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने गाव तिथे शिवसेनेची शाखा उभी राहिली पाहिजे. या शाखांवर असणाऱ्या फलकांवरुन आपापसात वाद होऊ नयेत म्हणून अंबादास दानवे यांनी चांगली संकल्पना मांडली आहे. शिवसेना शाखेच्या फलकावर कोणत्याही नेत्याच्या नावाऐवजी फक्त पक्षाचे नाव असेल. म्हणजे कोणाच्याही रागलोभाचा प्रश्नच उद्धवणार नाही. नाहीतर फलकावर बबलूचं नाव आलं की उद्धवला राग येतो, उद्धवचं नाव आलं की आप्पाला राग येतो. त्यामुळे शाखेच्या फलकावर फक्त पक्षाचेच नाव लिहणे योग्य ठरेल. शिवसेना म्हटंल की आपल्या सगळ्यांचा समावेश होता, असे संजय जाधव यांनी म्हटले.
परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीच्या नाट्यावरून शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले आहे. वेळ आल्यावर माकडीणही आपल्या पिल्लाला पाखाली घालते. आम्हीही राष्ट्रवादीला पायाखाली घालू, असा इशारा संजय जाधव यांनी दिला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होणार काय? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
खासदार संजय जाधव यांनी जालन्यात शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना हा इशारा दिला आहे. माकडीण सुध्दा गरज पडल्यावर पिल्लाला बुडवते. आम्ही पण राष्ट्रवादीला बुडवू. मी फक्त आंचल गोयल प्रकरणी शिफारस केली होती. पण राष्ट्रवादीने रान उठवले. तुम्हाला सगळे जमते. आमचे तेवढे उघडे करता. आता पाणी वर जात आहे, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या :
जिल्हाधिकारीपदी रुजू होण्यासाठी बाळासह परभणीत, आंचल गोयल यांनी अखेर पत्राद्वारे पदभार स्वीकारला