Sanjay Raut allegation Eknath Shinde : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंडर निघण्याआधीच गुजरातच्या ठेकेदारांकडून सरळ 40 टक्के घेतात”, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून एकनाथ शिंदेंवर टीका केली. यात त्यांनी धारावी पुनर्वसनासह गुजरातला उद्योग धंदे पळवले जात आहेत, या मुद्द्यावरूनही घणाघात केला.
शिवसेनेतून फुटून निघालेले एकनाथ शिंदे वगैरे लोकांना आता मुंबई, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी काहीच देणे-घेणे राहिलेले नाही. “निवडणुका आल्या की शिवसेनेला मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार वगैरेची आठवण येते व ते तशा बोंबा मारतात,” असे मुख्यमंत्री शिंदे सांगतात. त्यांनी असे बोलणे हे फक्त पक्षांतर नसून एक प्रकारे धर्मांतरसुद्धा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्राच्या निर्मितीपासून मुंबईवर टांगती तलवार आहे व शिंदे-फडणवीसांच्या काळात ही तलवार अधिक धारदार बनून खाली आली आहे. मुंबईचे ओरबडणे सोपे व्हावे म्हणून मुख्यमंत्रीपदी शिंदे यांची नेमणूक सध्याच्या दिल्लीश्वरांनी केली. शिंदे व त्यांच्या लोकांचा संबंध फक्त पैशांशी आहे व हा पैसा त्यांना गुजरातच्या उद्योगपतींकडून मिळतो. मंत्रालयातले एक वरिष्ठ अधिकारी दिल्लीत भेटले. “मुख्यमंत्री शिंदे हे एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पाच्या घोषणा करतात व त्या कामांचा आदेश व टेंडर निघण्याआधीच गुजरातच्या ठेकेदारांकडून सरळ 40 टक्के घेतात. काही हजार कोटींची ही उलाढाल सुरू आहे.”
पालघर, रायगड, अलिबागसारखा प्रदेश एम.एम.आर.डी.ए.च्या टाचेखाली आणणे हा विकास नसून मुंबईसह अर्धा महाराष्ट्र परप्रांतीय धनिकांना विकण्याचा डाव आहे. मुंबईचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते, असेही संजय राऊतांनी म्हटले.
त्यात आता धारावीचा विषय पेटू लागला आहे. मुंबई आता गर्भश्रीमंतांचे शहर बनवले जात आहे. मुंबईतील एक-एक फ्लाट 180 कोटीला विकला जातोय. काळय़ा बाजाराचे व काळय़ा पैशांचे हे अड्डे झाले. गरीब मराठी माणूस फुटपाथवर चालतो. त्याला श्रीमंतांच्या गाडय़ा उडवून पुढे जातात. या लढाईत गिरगाव, दादर, परळ, पार्ले आधीच पडले आहे. मुलुंड, भायखळा, वांद्रे, धारावी पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईची हद्द पालघर, अलिबागपुढे वाढवली. यात बिल्डर आणि धनिकांचाच फायदा आहे. मुंबईत आणि समुद्रापलीकडेही मराठी माणूस नाही, हे चित्र ज्यांच्या हृदयास पीडा देत नाही त्यास मराठी माणूस कसे म्हणावे? असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
धारावीच्या निमित्ताने मुंबईच्या मोक्याच्या जमिनी गिळून ढेकर देणाऱ्यांच्या पाठीशी आज महाराष्ट्राचे शासन उभे आहे. कारण लुटीतला वाटा त्यांना मिळतोय. हा वाटा किती? महाराष्ट्रावर सध्या जितके कर्ज आहे तेवढा वाटा मुंबई विकण्याची दलाली करणाऱ्यांना मिळेल, असाही आरोप संजय राऊतांनी केला आहे.