मुंबई : मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनौतचं कार्यालय तोडलं. त्यामुळे तिने मलाही या खटल्यात पार्टी केल्यानं आश्चर्य वाटलं आणि धक्काही बसला. माझ्यावर यापूर्वीही शेकडो खटले झाले आहेत. अशा खटल्यांना मी घाबरत नाही. महाराष्ट्राच्या बदनामीविरुद्ध लढलो म्हणून मला जर कुणी तुरुंगात टाकत असेल तर मी तुरुंगातही जायला तयार आहे, असा इशारा शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला. ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना संजय राऊत यांनी हा इशारा दिला. (Sanjay Raut On Kangana Ranaut bungalow demolition)
”मुंबई महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. कंगनाच्या कार्यालयावर कारवाई होते, हे मला माहीत नव्हतं. माहित असण्याचं कारणही नव्हतं. पण तरीही मला कंगनाने या खटल्यात पार्टी केल्याने आश्चर्य वाटलं असून धक्काही बसला आहे. मी न्यायालयाचा नेहमीच सन्मान करतो. त्यामुळे उद्या किंवा परवा या प्रकरणाबाबत मी कोर्टात माझं म्हणणं मांडणार आहे, असं सांगतानाच या प्रकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
”कंगनाशी माझं कोणतंही वैयक्तिक भांडण नाही. मराठी माणूस म्हणून मी मराठी द्वेषाविरोधात उभं राहिलो आणि राहतो यापुढेही राहिन. महाराष्ट्र आणि मराठीच्या अस्मितेसाठी भूमिका घेणं हा जर कुणाला अपराध वाटत असेल तर हा अपराध मी वारंवार करत राहील, असं सांगतानाच मला मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही,” असा इशाराही राऊतांनी दिला.
यापूर्वीही माझ्यावर शेकडो केसेस झाल्या आहेत. अगदी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझ्यावरही अग्रलेखावरुन खटले दाखल झाले. प्रत्येक वेळी बाळासाहेब माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले, असं सांगतानाच महाराष्ट्राची अस्मिता, मराठीची अस्मिता आणि महाराष्ट्राच्या बदनामीविरुद्ध लढलो म्हणून कोणी जर मला तुरुंगात टाकत असेल तर तुरुंगात जायला मी तयार आहे, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्म सिटीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. बॉलिवूडमध्ये कुणालाही प्रवेश नाकारला नाही. इथे सर्वांचेच स्वागत आहे. या महाराष्ट्राने देशाच्या सिनेसृष्टीचा पाया घातला. त्यामुळे कुणी आम्हाला अक्कल शिकवू नये, असं सुनावतानाच ज्यांना दादासाहेब फाळके यांचं नाव उच्चारता येत नाही. ते आम्हाला शिकवतात यापेक्षा मोठा विनोद नाही, असा टोलाही त्यांनी कंगनाला तिचं नाव न घेता लगावला. (Sanjay Raut On Kangana Ranaut bungalow demolition)
संबंधित बातम्या :
बडा नेता कोण? दुसरं -तिसरं कोणी नाही, खडसेंचीच राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा