“अजित पवार बारामतीत पराभूत होणार”, शिवसेना खासदाराची भविष्यवाणी

| Updated on: Aug 13, 2024 | 12:00 PM

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आम्हाला पाठबळ द्या, माझी लाडकी बहीण योजना अखंडपणे सुरू राहील. हा दादाचा वादा आहे, असे वक्तव्य केले. त्यावरुन आता शिवसेनेच्या खासदाराने टीका केली आहे.

अजित पवार बारामतीत पराभूत होणार, शिवसेना खासदाराची भविष्यवाणी
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

Shivsena MP Comment Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत महिलांना दर महिना १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आम्हाला पाठबळ द्या, माझी लाडकी बहीण योजना अखंडपणे सुरू राहील. हा दादाचा वादा आहे, असे वक्तव्य केले. त्यावरुन आता शिवसेनेच्या खासदाराने टीका केली आहे.

“अजित पवार हे स्वत: बारामतीत पराभूत होणार आहेत. बारामतीच्या सर्व लाडक्या बहिणी या त्यांना पराभूत करणार आहेत. महाराष्ट्रात सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत. लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतील”, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केले.

त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका

“लाडकी बहिण योजना ही चांगल्या हेतूने आणलेली नाही. फक्त महिलांची मतं मिळावीत, या हेतूने ही योजना आणलेली आहे. अजित पवार हे स्वत: बारामतीत पराभूत होणार आहेत. बारामतीच्या सर्व लाडक्या बहिणी या त्यांना पराभूत करणार आहेत. महाराष्ट्रात सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत. लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतील. लाडक्या बहिणी या इतक्या लाचार नाहीत. हे सर्व बोलणारे सरकारी लोचक मजनू आहेत. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका”, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फक्त १५०० रुपये देतात

“सरकारी पैशाची उधळपट्टी करत आहे. भ्रष्टाचार आमदारांना ५० कोटी, खासदारांना १०० कोटी आणि नगरसेवकांना विकत घेण्यासाठी ५ कोटी दिले जातात. पण लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये देतात. ते पण मत दिलं नाही, तर काढून घेऊ, या धमक्या दिल्या जातात. ही या महाराष्ट्राची अवस्था आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.