मुंबई: परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणानंतर दिल्लीत राहून सातत्याने पत्रकारपरिषदांच्या माध्यमातून भाजपचा हल्ला परतवून लावणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक नवे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी आपल्या ट्रेडमार्क स्टाईलचा वापर केला आहे. त्यांनी एक शेर ट्विट केला आहे. ‘आसमान मे उडने की मनाही नही है…. बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे’, अशा मजकूर त्यामध्ये आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणासाठी आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Shivsena leader Sanjay Raut new tweet says Bura na Mano Holi Hai)
सध्या फोन टॅपिंग आणि परमबीर सिंह यांच्या पत्रावरून संजय राऊत भाजपच्या आरोपांना तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत. तर दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदावरून संजय राऊत महाविकासआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसशीही दोन हात करत आहेत. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे वास्तवाकडे दुर्लक्ष करु नका, अशा आशयचा राऊतांचा हा संदेश नेमका कोणासाठी आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी ‘बुरा न मानो.. होली है………’ अशी कॅप्शनही लिहली आहे.
बुरा न मानो..
होली है……… pic.twitter.com/4pqmYKGJoC— Sanjay Raut (@rautsanjay61) March 28, 2021
2019मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात रंगलेल्या सत्तानाट्यावेळीही संजय राऊत अशाचप्रकारे दररोज सूचक शेरोशायरी करताना दिसले होते. आताही ठाकरे सरकार अडचणीत सापडल्यानंतर संजय राऊत त्याचप्रकारे शेरोशायरीची ट्विटस आणि पत्रकारपरिषदा घेऊन खिंड लढवताना दिसत आहेत.
सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोष्टी घडल्या. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपण शहाणं असल्याचं वाटायला लागतं, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आलं, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या:
नाना पटोलेंच्या इशाऱ्यानंतर काँग्रेसच्या आणखी एका नेत्याची ठाम भूमिका; शरद पवारांबद्दल आदर पण….
लक्षात ठेवा, ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, नाना पटोलेंचा शिवसेनेला रोखठोक इशारा
(Shivsena leader Sanjay Raut new tweet says Bura na Mano Holi Hai)