मुंबई : औरंगाबादेतल्या विराट सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , संजय राऊत (Sanjay Raut) अन् शिवसेनेच्या इतर नेत्यांनी विरोधकाचे वाभाडे काढले. त्यानंतर आज संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करत विरोधकांना गाडण्याची भाषा केली आहे.संजय राऊत ज्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात त्याच पद्धतीने त्यांनी विरोधकांना सूचना वजा इशारा देणारं ट्विट केलं आहे.”उन्हे सफलतासे मारो और मुस्कुराहट से दफना दो!”, असं म्हणत त्यांनी विरोधकांना गर्भित इशारा दिला आहे.
राऊतांनी ट्विटच्या माध्यमातून विरोधकांवर बाण सोडलाय. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो समोरचा त्यांचा फोटो शेअर केला आहे. आपल्या यशाने, कीर्तीने विरोधकांना मारा आणि आपल्या हास्याने त्यांना गाडा, असं कॅप्शन त्यांनी दिलंय. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांचं हे ट्विट सूचक आहे.
उन्हे सफलतासे मारो
और..
मुस्कुराहट से दफना दो!जय महाराष्ट्र!!! pic.twitter.com/2N2W71KM27
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 9, 2022
सध्या राज्यसभा आणि विधानपरिषदेची निवडणूक होतेय. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. अश्यात सहावी जागा आमचीच असा दावा भाजप आणि महाविकास आघाडी दोघांकडून करण्यात येतोय. यात मतदानाच्या एक दिवस आधी संजय राऊतांचं हे असं ट्विट विजय महाविकास आघाडीचाच होणार असा विश्वास दाखवणारं आहे.
आजच्या घडीला देशाचं नेतृत्व फक्त महाराष्ट्र करू शकतो.ती ताकद फक्त उद्धव ठाकरेंमध्येच आहे, असा दावा संजय राऊत यांनी औरंगाबादच्या विराट सभेत केला. काश्मीरमध्ये होत असलेल्या हिंदुंच्या हत्यांवरून राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. काश्मीरी पंडितांना आता फक्त हिंदुहृदय सम्राट उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत, असंही राऊत म्हणाले. औरंगाबादमधील शिवसेनेच्या शाखेच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांची जाहीर विराट सभा आयोजित करण्यात आली होती. तिथे ते बोलत होते.
राज्यसभा निवडणुकीमध्ये एकही मत फुटू नये यासाठी सर्वच पक्ष अतोनात प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं गेलंय. आमदार फुटू नयेत यासाठी दोन्ही बाजूने काळजी घेतली जात आहे. मतदान कसं करावं या संदर्भात आमदारांची कार्यशाळाही झाली. त्याबरोबर आपल्या पारड्यात छोट्या पक्षांच्या आमदाराचं आणि अपक्ष आमदारांचं मत कसं पडेल यासाठी चुरस सुरू आहे.