सिंधुदुर्ग : “नारायण राणे (Narayan Rane) यांना सूक्ष्म उद्योग मंत्री करा, अतिवरिष्ठ मंत्री करा किंवा थेट पंतप्रधान करा, शिवसेनेला दुःख वाटण्याचं कारण नाही” अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर दिलं. भारतीय जनता पार्टीला राणेंना मंत्रिपद द्यायचं होतं, ते त्यांनी दिलं, आता तिथे सुखाने रहा. त्या खुर्चीवर बसून पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे अजून कोणाला दुखवू नका, असा टोलाही विनायक राऊतांनी लगावला. (Shivsena MP Vinayak Raut taunts Minister Narayan Rane after criticising CM Uddhav Thackeray)
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांची नुकतीच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रिपदी वर्णी लागली. पदभार स्वीकारल्यानंतर आपल्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या, मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत, असा प्रश्न विचारल्यावर ते एवढ्या मोठ्या मनाचे नाहीत, अशी टीका नारायण राणेंनी केली होती. त्या टीकेला विनायक राऊत यानी प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले विनायक राऊत?
“नारायण राणे यांचा शिवसेनेकडे आणि खास करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे, तो आजही बदललेला नाही, याच गोष्टीचं दुःख वाटतं” अशी खंत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली. “राणेंना सूक्ष्म उद्योग मंत्री करा, अतिवरिष्ठ मंत्री करा किंवा थेट पंतप्रधान करा, शिवसेनेला दुःख वाटण्याचं कारण नाही. भाजपला राणेंना मंत्रिपद द्यायचं होतं, ते त्यांनी दिलं, आता तिथे सुखाने रहा. त्या खुर्चीवर बसून पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे अजून कोणाला दुखवू नका” असा टोला राऊतांनी लगावला.
राणे काय म्हणाले होते?
पदभार स्वीकारताना राणेंंनी नोंदबुकमध्ये ‘ओम श्रीगणेशा’ लिहित आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी सेनेविरोधातही श्रीगणेशा केला. पदभार स्वीकारलेल्या खुर्चीवरुनच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पहिला वार केला. ‘मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पण उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, असं म्हणत राणेंनी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच उद्धव यांच्यावर निशाणा साधला.
संबंधित बातम्या :
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा पहिल्याच दिवशी कामाचा धडाका, अधिकाऱ्यांनाही घेतलं फैलावर!
(Shivsena MP Vinayak Raut taunts Minister Narayan Rane after criticising CM Uddhav Thackeray)