मुंबई : शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर हल्ला चढवला आहे. बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, हे तर दुतोंडी साप आहेत, अशा शब्दात त्यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला आहे.
एका बाजूला बाळासाहेबांप्रति आदर व्यक्त करायचा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी राज्याची सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिले होते, त्या उद्धव ठाकरेंविषयी सातत्याने गरळ ओकायची म्हणजे दुतोंडी सापासारखे ह्यांचे वर्तन आहे, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी राणेंवर टीकेची तोफ डागली.
देवेंद्र फडणवीस यांनी राणेंचे समर्थन केले ही त्यांची मजबुरी आहे. ते नारायण राणे यांच्यामागे फरफटत जात आहेत. ह्या फरफटत जाण्याचा अर्थ काही दिवसांत त्यांच्या लक्षात येईल. आमच्यावर बोलत राहिल्याशिवाय नारायण राणेंना मीडिया प्रसिद्धी देत नाही म्हणून ते रोज बोलतात, असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला.
मुंबई महापालिकेच्या नाटकाचा प्रयोग चार वेळा झालाय. मुंबई आणि कोकणवासीयांचे शिवसेनेवर किती प्रेम आहे हे सर्वांनी पाहिले आहे. कोरोना काळात ज्या प्रकारची सेवा शिवसेनेने केले ते कधीच कुणी नाकारणार नाही. मंत्री पद मिळाले म्हणून सतत बोलत राहून लोकांची दिशाभूल करत राहणे एवढाच त्यांचा अजेंडा आहे. मराठीत म्हण आहे ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ तशा पद्धतीचं त्यांचं बोलणं आहे, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
हे ही वाचा :
बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं; राणेंचा हल्लाबोल