नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission) आज शिवसेना पक्षासंदर्भात महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आयोगासमोर उपस्थिती लावली. आज ठाकरे (Thackeray) गट आणि शिंदे गट या दोघांकडूनही जबरदस्त युक्तिवाद होण्याची चिन्ह होती, मात्र आज फक्त पाच ते सात मिनिटं हे प्रकरण आयोगासमोर चाललं. मुख्य याचिकेच्या अनुषंगाने इतर दोन ते तीन अर्ज आल्याने यासंदर्भातील सविस्तर सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला. शिवसेना नेते अनिल देसाई (Anil Desai) यांनी ही माहिती दिली.
आजच्या सुनावणीदरम्यान, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल तर महेश जेठमलानी उपस्थित होते. ठाकरे गटाचे महत्त्वाचे लोकप्रतिनिधीदेखील उपस्थित होते. मात्र शिंदे गटाकडून कोणतेही नेते निवडणूक आयोगाच्या सुनावणीला उपस्थित होते. सुनावणी झाली तेव्हा दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. मात्र काही वेळातच यापुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे सांगण्यात आले.
शिवसेना पक्षावरील निर्णय घेण्यात केंद्रीय निवडणूक आयोग पळवाट काढतंय. शेवटची तारीख डिसेंबर 23 होती, तीदेखील पुढे ढकलली, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलाय.
ठाकरे गटातर्फे 20 लाख प्रतिणापत्र दाखल केली आहेत. शिंदे गटाला वेळ देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं तारीख पुढे ढकलली, असा आरोप त्यांनी केला. शिंदे गटानं दिलेली कागदपत्रे आम्हाला तपासायची आहेत, अशी मागणी अरविंद सावंत यांनी माध्यमांसमोर केली.
केंद्रीय संस्था बरबटलेल्या आहेत. हे सगळं आता लोकशाहीच्या मूळावर आलंय. केंद्रीय संस्था मूळ उद्दिष्ट आणि कर्तव्यापासून दूर गेल्या आहेत, अशी खंत अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.