मुंबईः शिवसेना (Shivsena), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मुख्यमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि महाराष्ट्रातील राजकारणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अशा शिवसेना पक्षासंदर्भात महत्त्वाची सुनावणी आज निवडणूक आयोगासमोर पार पडणार आहे. विशेष म्हणजे केवळ शिवसेना पक्षच नव्हे तर उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख पदावर राहणार की नाही, यासंदर्भाची महत्त्वाची सुनावणी आज आयोगासमोर होणार आहे.
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष कुणाचा, यावर आज महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास केंद्रीय निवडणूक आयोगात यासंदर्भात युक्तिवाद सुरू होईल.
शिवसेना पक्षाच्या खटल्यात यापूर्वी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वाची मागणी केली. सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेविषयीचा खटला सुरु आहे. त्याचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाविषयीची सुनावणी घेऊ नये, अशी विनंती ठाकरे गटाच्या वकिलांनी केली होती.
तर सुप्रीम कोर्टाने अद्याप कुणालाही अपात्र ठरवलं नसल्याने शिवसेना चिन्हासंबंधी निर्णय घेण्यास हरकत नाही, असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला आहे.
तसेच शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी पक्ष प्रमुख पदाविषयी महत्त्वाचा युक्तिवाद केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी अवैधरित्या पक्षप्रमुख पद स्वतःकडे ठेवल्याचा दावा आयोगासमोर करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजची सुनावणी सर्वाधिक महत्त्वाची आहे. कारण येत्या २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख पदाची मुदत संपत आहे. त्यासाठीच
शिवसेना ठाकरे गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी मागितली आहे. आयोगासमोर खटला सुरु असताना ही परवानगी मिळते की नाही, यावर उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद राहणार की जाणार, हे अवलंबून आहे.
प्रतिनिधी सभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांना परवानगी मिळाली तर ही महत्त्वाची घडामोड समजली जाईल. संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी दिली तर आयोगाने ठाकरे गटाचं अस्तित्व मान्य केल्यासारखं होईल.
शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेच्या निवडणुकीसाठी परवानगी नाही मिळाली तर धनुष्यबाण आणि पक्षासंबंधी निकाल लागेपर्यंत उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुख पदाची मुदत वाढवून मिळण्याचीही शक्यता आहे. किंबहुना आजच्या सुनावणीत एंकदरीत पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो, असेही म्हटले जात आहे.