नागपूरः विधानसभेचं हिवाळी अधिवेशन (Winter session) आजपासून सुरू होतंय. शिवसेना पक्षांतर्गत मोठी फूट पडल्यानंतरचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे. त्यामुळे नागपूर (Nagpur) येथील विधानभवन परिसरातील शिवसेना कार्यालयात (Shivsena Office) नेमके कोण बसणार? शिंदे गटाचे आमदार, मंत्री बसणार की ठाकरे गटाचे नेते बसणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र विधानभवनातील कार्यालयाचीच विभागणी करण्यात आल्याने हे चित्र स्पष्ट झाले आहे.
टीव्ही 9 च्या प्रतिनिधींनी नागपूर विधानभवन परिसरातील पक्षांच्या कार्यालयांना भेट दिली, त्यावेळी ही विभागणी दिसून आली.
दरम्यान, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील आजच्या नागपूरातील हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक नागपुरात होत आहे. बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते अधिवेशनाला उपस्थिती लावतील.
शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह यावर एकनाथ शिंदे यांनी दावा केल्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाकडे गेला आहे. 12 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटाच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. तत्पुर्वी दोन्ही गटाने पक्षावर दावा सांगणारे पुरावे, प्रतिज्ञापत्र आयोगसमोर सादर केले आहेत. आता यापुढील निवडणूक आयोगाची सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.