काँग्रेससोबत आघाडीमुळे नाराज, मोदी फॉलो करत असलेल्या कट्टर शिवसैनिकाचा राजीनामा

| Updated on: Nov 27, 2019 | 12:36 PM

'जो माझ्या रामाचा नाही, तो माझ्या कामाचा नाही' असं रमेश सोळंकींनी ट्विटरवर लिहिलं आहे.

काँग्रेससोबत आघाडीमुळे नाराज, मोदी फॉलो करत असलेल्या कट्टर शिवसैनिकाचा राजीनामा
Follow us on

मुंबई : सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी एका शिवसैनिकाला रुचलेली दिसत नाही. रमेश सोळंकी या शिवसेनेच्या कार्यकर्त्याने युवासेना आणि शिवसेनेतील पदाचा राजीनामा दिला आहे. व्हेरीफाईड ट्विटर अकाऊण्टवरुन सोळंकींनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. ‘जो माझ्या रामाचा नाही, तो माझ्या कामाचा नाही’ असं सोळंकींनी (Shivsena Party Worker Resigns) लिहिलं आहे.

हो-नाही म्हणता म्हणता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने भाजपसोबत युती जाहीर केल्यामुळे काही शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. स्वबळावर लढून जिंकण्याचा अनेक कार्यकर्त्यांचा निर्धार होता. त्यातच, निकालानंतर सत्तेत जाण्यासाठी बहुमताचा आकडा नसल्यामुळे शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतला आणि संपूर्ण विरोधी विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेतलं. त्यामुळे काही शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार म्हटल्यावर माझ्यावर हसायचे, आज मी हसतोय : राऊत

‘1992 मध्ये मी वयाच्या बाराव्या वर्षी बाळासाहेबांच्या निर्भीड नेतृत्वाने प्रभावित झालो होतो. बाळासाहेबांच्या करिष्म्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा मनापासून विचार केला होता. 1998 मध्ये मी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला.’ असं ट्वीट रमेश सोळंकींनी केलं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीही रमेश सोळंकी यांना फॉलो करतात.

 

‘बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर चालत शिवसेनेत विविध पदं भूषवली. एक ध्येय आणि एक स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकांसाठी काम केलं. गेल्या 21 वर्षांत मी कधीच पद किंवा उमेदवारी मागितली नाही, पण अहोरात्र पक्षासाठी काम केलं. मात्र शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याचा राजकीय निर्णय घेतला’ असं सोळंकींनी लिहिलं आहे.

‘जेव्हा जहाज बुडायला लागतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर उड्या मारतात. पण मी माझा पक्ष सर्वोच्च उंचीवर असताना सोडत आहे’ असं सोळंकी यांनी म्हटलं आहे.

‘जो माझ्या श्रीरामाचा नाही (काँग्रेस), तो माझ्या काही कामाचा नाही. पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांचे आभार. तुमच्यासोबत काम करण्यात आनंद मिळाला.’ असं एकापाठोपाठ एक केेलेल्या ट्वीट्समध्ये रमेश सोळंकी (Shivsena Party Worker Resigns) यांनी लिहिलं आहे.