मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार (Rohit Pawar) कासवगतीने पुढे जात आहेत आणि शरद पवारांना (Sharad Pawar) साथ देत आहेत. बारामतीत (Baramati) नव्या पवारांचा उदय दिसत आहे, अशा शब्दात शिवसेनेने ‘सामना’तून (Saamana Shivsena) शरद पवार यांचे नातू रोहित यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मते येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष संपेल आणि त्या पक्षात फक्त शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील. पण एका चौथ्या पवाराने भाजपच्या आरोपांना उत्तर दिलं असून पवारांचे नातू रोहित पवार यांनी विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत’ असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
‘पवारांचा राष्ट्रवादी पक्ष एका फुटीतून उभा राहिला. त्यामुळे फुटलेलेच पुन्हा फुटले. चौथ्या पवारांनी तीर मारताना सांगितलं, की घरात आमदारकीपासून खासदारकी आलेली नेते मंडळी कुंपणावरुन उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. जाडंभरडं पीठ दुसऱ्या पक्षात गेल्याचं रोहित पवार म्हणाले. सर्व पडझडीत प्रथमच एका पवारांचा तीर सुटला. या तीराने कोणी घायाळ झालं नाही, पण तीर सुटला हे महत्त्वाचं’ याकडे शिवसेनेने लक्ष वेधलं आहे.
‘गरज पडली की शरद पवारांचा सल्ला घ्यायचा. बारामतीत येऊन सोयीनुसार कौतुक करायचं आणि निवडणुकांच्या वेळी साहेबांनी काय केलं असं विचारायचं. कुणीही उठावं आणि बोट दाखवावं असं साहेबांचं राजकारण नाही, असंही शरद पवारांनी ठणकावलं आहे’ असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
आयारामांची रांग शिवसेनेतही लागली आहे. पण आमच्याकडे माणसं धुवून घेण्याचं वॉशिंग मशिन नसल्यामुळे माणसं पारखूनच घ्यावी लागतात, असा टोला भाजपला लगावण्यात आला आहे.