मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर प्रथमच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील सर्व शिवसैनिक आणि युवा सैनिकांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. उद्या म्हणजेच शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजता हा मेळावा असून या निमित्ताने शिवसेना पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करणार आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे नाही तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडीचा प्रमुख पक्ष शिवसेना पूर्णपणे पोखरली गेल्याने सध्या शिवसेनेची अवस्था खिळखिळी झाली आहे. विधानसभेतील बहुतांश आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून एकनाथ शिंदेंच्या गटाची वाट धरली आहे. आता आगामी महानगर पालिका निवडणुकीत तरी शिवसैनिक नगरसेवक, पदाधिकारी फुटू नयेत, या दृष्टीने शिवेसेनेच्या हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचा भव्य मेळावा उद्या आयोजित करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शनिवारी शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेल्या या मेळाव्यात शिवसैनिकांचं मोठं शक्ती प्रदर्शन पहायला मिळणार आहे. दक्षिण मुंबई विभागाच्या वतीनं हा जाहीर मेळावा असून युवानेते आदित्य ठाकरे यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. मरीन लाइन्स येथील बिरला मातोश्री सभागृह येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले असून उद्धव ठाकरेंशीच निष्ठावंत राहणाऱ्यांचा एक गट आहे तर आमदारांनी बंड केलं ते चांगलं केलं, असं म्हणणाऱ्यांचा एक गट आहे. खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या आमदारांना परत येण्यासाठी भावनिक आवाहन केलं होतं. मात्र त्याचा फार परिणाम झाला नाही. उलट शिंदे गटाकडे जाणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली. त्यांनंतर आता शिवसैनिकांच्या जाहीर मेळाव्याला उद्या आदित्य ठाकरे संबोधित करतील. युवासेनेत लोकप्रिय नेतृत्व असलेले आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये उत्साह भरू शकतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आज शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक आज पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. शिवसेनेसाठी जीवही देईन.. मरेन पण शिवसेना सोडणार नाही, असे म्हणणारे आज पळून गेले. मात्र बंडखोरांनी यापुढे शिवसेना आणि ठाकरे या दोन नावांव्यतिरिक्त जगून दाखवावं, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी आज बंडखोरांना दिलंय. तसंच निष्ठावंत शिवसैनिकांना पुढील संघर्षासाठी प्रोत्साहन दिलं.