गुजरात व्यापारी, पण महाराष्ट्र लढवय्या, दिल्लीच्या आडमुठेपणामुळे कोरोना लसीकरण थांबले, शिवसेनेचा घणाघात

| Updated on: May 01, 2021 | 7:39 AM

मराठी माणसाचे कणे मोडले नाहीत. कारण महाराष्ट्राने कधीच स्वाभिमानासाठी तडजोड स्वीकारली नाही, असेही शिवसेनेनं यात म्हटले आहे. (Shivsena on Maharashtra Day 2021)

गुजरात व्यापारी, पण महाराष्ट्र लढवय्या, दिल्लीच्या आडमुठेपणामुळे कोरोना लसीकरण थांबले, शिवसेनेचा घणाघात
संजय राऊत आणि नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात काहीही करुन राजकीय आणि आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरूच आहे. दिल्लीतील सरकारे बदलत राहिली तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही. महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही. महाराष्ट्राला इतिहास आहे. बूड आहे म्हणून तो टिकला आहे. महाराष्ट्रनिर्मितीचा क्षण हा मंगलमयच असतो. तो दिवस महाराष्ट्राचे शौर्य व धैर्य दाखवणारा असतो. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील व विजयी होईल! असे शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खास अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. (Shivsena Saamana Editorial Comment on Maharashtra Day 2021)

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?  

संकटाशी लढण्याची मोठी परंपरा हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात पंडित नेहरू प्रतापगडावर आले तेव्हा त्यांच्या समोर निधडय़ा छातीने महाराष्ट्र उभा राहिला होता. महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही. महाराष्ट्राला इतिहास आहे. बूड आहे म्हणून तो टिकला आहे. महाराष्ट्रनिर्मितीचा क्षण हा मंगलमयच असतो. तो दिवस महाराष्ट्राचे शौर्य व धैर्य दाखवणारा असतो. आज महाराष्ट्रावरचे संकट मोठे आहे. कोरोना विषाणूने मोठे आव्हान उभे केले आहे. शंभर वादळे, शंभर भूकंपांनी पडझड होणार नाही त्यापेक्षा जास्त पडझड एका विषाणूने केली. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील व विजयी होईल! असे शिवसेनेनं यात म्हटलं आहे.

महाराष्ट्र दिन कसा साजरा करावा?

कोरोना संकटाच्या भयंकर सावटाखालीच महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सोहळा साजरा होत आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीची ही एकसष्ठी. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना महामारीचे संकट थैमान घालत आहे. महाराष्ट्र छातीचा कोट करून या संकटाशी सामना करीत आहे. महाराष्ट्र आज कडक निर्बंधात जखडून पडला आहे. लोकांच्या जगण्यावरच बंधने पडली आहेत. सभोवती वातावरण निराशा आणि मरगळ आणणारे आहे. मृत्यूंच्या बातम्यांनी मन रोज बधीर होत आहे. चांगले काही घडत नाही. घडण्याची शक्यता नाही. देश, राज्य, समाज, धर्म या सर्व संकल्पना बाद ठरवून प्रत्येकजण फक्त जगण्याचाच संघर्ष करीत आहे. अशा वातावरणात महाराष्ट्र दिन कसा साजरा करावा? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

…पण कोरोनाच्या संकटाने सर्व मनसुबे निर्बंधात अडकले

महाराष्ट्र दिनाच्या सोहळय़ावरही बंधने आलीच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मराठी मनाचे प्रतीक आहेत. शिवाजी महाराज या एका वलयाने इतके मोठे महाराष्ट्र राज्य भावनिकदृष्टय़ा बांधून ठेवले आहे. महाराष्ट्र राज्य निर्माण झाले ते मोठय़ा संघर्षातून, पण तरीही ‘जय शिवाजी, जय भवानी’ या एका मंत्राने सर्व पडझडीतही महाराष्ट्र एकवटून उभा राहतो. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून संघर्ष आणि लढय़ातून निर्माण झालेले हे महाराष्ट्र राज्य. गेल्या साठ वर्षांत राज्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. महाराष्ट्राच्या एकसष्ठीमध्ये राज्याची सूत्रे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. ठाकरे यांनी महाराष्ट्राची सूत्रे एका विशिष्ट परिस्थितीत स्वीकारली. या राज्याचा रथ पुढे न्यावा. देशात राज्याचा नावलौकिक वाढावा. मराठी माणूस, मराठी भाषेला वैभव प्राप्त करून द्यावे, शिक्षण, उद्योग, व्यापार, पायाभूत सुविधांत महाराष्ट्राला शिखरावर न्यावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी काम सुरू केले, पण कोरोनाच्या संकटाने सर्व मनसुबे निर्बंधात अडकले, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

महाराष्ट्राने कधीच स्वाभिमानासाठी तडजोड स्वीकारली नाही

आज महाराष्ट्र लढतो आहे तो प्रत्येक जीवाचे रक्षण करण्यासाठी. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी 105 जणांचे हौतात्म्य कामी आले, हे विसरता येत नाही. पण आजच्या संकटसमयी आजूबाजूला आपल्या ओळखीपाळखीचा, आप्तस्वकीय रोजच बळी जात आहे. त्यामुळे आजचा महाराष्ट्र दिन अश्रूंनी भिजला आहे. संयुक्त महाराष्ट्र लढय़ात आम्ही बेछूट गोळीबार अनुभवला. आज कोरोनाच्या बेछूट हल्ल्यापुढे तो गोळीबारही फिका पडला. मुख्य म्हणजे जात, धर्म, प्रांतवादाच्या भिंतीही तुटून पडल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्र लढय़ामागे एक प्रेरणा होती. शिवरायांचा विचार होता. त्यात जातवाद आणि प्रांतवाद तर अजिबात नव्हता. भाषावार प्रांतरचनेत सर्व प्रांतांना आपल्या भाषेचे राज्य मिळाले, पण मराठी माणसाला मात्र फुटकेतुटके, कुरतडून टाकलेले राज्य देऊ केले. मुंबईचे तर मुंडकेच उडविले. बेळगाव, कारवार, निपाणीसह 56 गावांचा मुलूख कर्नाटकला दान दिला. डांग, उंबरगाव हे मराठी भाषिक भाग गुजरातला दिले. मुख्य लढा मुंबई-बेळगावसाठी झाला. त्यात महाराष्ट्रातील आबालवृद्ध, स्त्री-पुरुष, मुले-मुली निर्भयपणे सामील झाली होती. पोलिसांच्या गोळय़ा कमी पडल्या, पण हुतात्म्यांची वाण पडली नाही. पोलिसांच्या लाठय़ा मोडल्या, पण मराठी माणसाचे कणे मोडले नाहीत. कारण महाराष्ट्राने कधीच स्वाभिमानासाठी तडजोड स्वीकारली नाही, असेही शिवसेनेनं यात म्हटले आहे.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान सुरूच

आजच्या संकटातही महाराष्ट्र ताठ कण्यानेच लढतो आहे. महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री व सरकार असल्याने दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची हरतऱहेने कोंडी करीत आहेत. महाराष्ट्राचे कोरोनाचे लसीकरण दिल्लीच्या आडमुठेपणामुळे थांबले आहे. महाराष्ट्राला इंजेक्शन, औषधांचा पुरवठा नीट होत नाही. ज्या महाराष्ट्राने आर्थिक प्राणवायूचा पुरवठा देशाला केला, त्या महाराष्ट्राला आज प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात काहीही करून राजकीय व आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरूच आहे. दिल्लीतील सरकारे बदलत राहिली तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही. महाराष्ट्राच्या हक्काचे व न्याय्य वाटय़ाचे काही मिळूच द्यायचे नाही. महाराष्ट्राला ओरबडायचे, त्याची लूट करायची हे धोरण मात्र सर्व काळात कायम राहिले, असा घणाघातही शिवसेनेनं केला आहे.

गुजरात व्यापारी, पण महाराष्ट्र लढणारा आहे

महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प व योजना गुजरातला नेऊन ठेवल्या. मुंबईचे महत्त्व कमी करायचे व महाराष्ट्राची आर्थिक रसद तोडायची हाच त्यामागचा हेतू. त्याच गुजरात राज्यात शेवटी कोरोना रुग्ण रस्त्यांवर तडफडून प्राण सोडताना दिसत आहेत. हे दृश्य विदारक आहे. महाराष्ट्र व गुजरात ही तशी जुळी भावंडे. सदैव एका नात्याने एकत्र राहिले. त्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आजही होतच आहे. गुजरात व्यापारी आहे, पण महाराष्ट्र लढणारा आहे, असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.  (Shivsena Saamana Editorial Comment on Maharashtra Day 2021)

संबंधित बातम्या : 

International Labor Day 2021 : जाणून घ्या 1 मे रोजी ‘कामगार दिवस’ का साजरा केला जातो?

कोरोना कालावधीत हेल्थ केअर कामगारांना सरकारचा दिलासा, विमा योजना 6 महिन्यांसाठी वाढवली

रोहित सरदानांच्या मृत्यूवर रविशकुमार काय म्हणाले? वाचा सविस्तर