मुंबई : आधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना हातात कटोरा घेऊन पुनः पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपासून अमेरिका आणि चीनच्या दारात जावे लागत आहे. इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानात आर्थिक अराजक पसरले आहे. इम्रान खान यातून मार्ग काढतीलही, पण खिशात आणा नसताना बाजीराव बनण्याचे सोंग पाकिस्तानने का करावे? असा सवाल शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असेलल्या सामनाच्या अग्रलेखातून पाकिस्तानातील गव्हाचा साठ्याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. (Shivsena Saamana editorial on wheat crisis in Pakistan)
आधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना हातात कटोरा घेऊन पुनः पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपासून अमेरिका आणि चीनच्या दारात जावे लागत आहे. त्यात गव्हाच्या टंचाईचे अभूतपूर्व संकट पाकिस्तानसमोर उभे ठाकले आहे. इम्रान खान यातून मार्ग काढतीलही, पण खिशात आणा नसताना बाजीराव बनण्याचे सोंग पाकिस्तानने का करावे, हा प्रश्न उरतोच! अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.
पाकिस्तानचा हा दिमाख बेगडी
‘खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आपला शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. भारतासाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानातील घटना, घडामोडींकडे कितीही डोळेझाक करायची म्हटली तरी दाराजवळचा शेजार म्हणून पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या आणि तेथील बऱ्यावाईट गोष्टींकडे नजर ठेवावीच लागते. कमालीचे दारिद्रय़, भुकेकंगाल जनता, महागाईचा आगडोंब, कर्जात आकंठ बुडालेला देश आणि जर्जर झालेली अर्थव्यवस्था हे पाकिस्तानचे वास्तवदर्शी रूप आहे. मात्र तरीही ‘आम्ही अण्वस्त्रसज्ज देश आहोत’ असा तोरा हा देश कायम मिरवत असतो. पाकिस्तानचा हा दिमाख बेगडी आहे हे आता जगापासून लपून राहिलेले नाही, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
तीन आठवडय़ांनंतर खायचे काय?
पाकिस्तानातून येणाऱ्या ताज्या बातमीने तर अब्रूची उरलीसुरली लक्तरेही वेशीवर टांगली गेली आहेत. पाकिस्तानची तिजोरी तर रिकामी आहेच, पण आता धान्याचे कोठारही जवळपास रिकामे झाले आहे. पाकिस्तानात अन्नामध्ये गव्हाचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. मात्र पाकिस्तानच्या विविध प्रांतांतील गव्हाचे साठे संपुष्टात आले आहेत. जेमतेम तीन आठवडे पुरेल एवढाच गहू निवडक गोदामांमध्ये शिल्लक आहे. तीन आठवडय़ांनंतर खायचे काय, असा गंभीर प्रश्न पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारपुढे निर्माण झाला आहे, असेही यात म्हटले आहे.
पाकिस्तानचे अर्थमंत्री शौकत तरीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला तातडीने 60 लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा करण्याची तातडीची गरज आहे. अन्नधान्याचे मूल्यनियंत्रण करणाऱ्या समितीच्या बैठकीत बोलताना अर्थमंत्री तरीन यांनी एकूणच गव्हाचे उत्पादन आणि गोदामांतील साठवणूक याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली. मागच्या आठवडय़ात पाकिस्तानकडे 6,47,687 मेट्रिक टन एवढाच साठा शिल्लक होता. मात्र पाकिस्तानी नागरिकांकडून होणारी गव्हाची विद्यमान खरेदी पाहता हा साठा आणखी घटून 3,84,000 मेट्रिक टन इतका खाली घसरेल. त्यानंतरच्या एक-दोन आठवडय़ांत गव्हाच्या टंचाईचे मोठे संकट पाकिस्तानवर कोसळेल, असे एकंदरीत चित्र आहे.
पाकिस्तानी जनतेच्या मनात कमालीची चीड
एप्रिलच्या अखेरीस पाकिस्तानात गहू कापणीचा हंगाम सुरू होतो आणि तिथून पुढे दोन-तीन आठवडे चालतो. गव्हाची कापणी, मळणी, साफसफाई आणि शेतकऱयांकडून बाजारपेठा आणि सरकारी गोदामापर्यंत गहू पोहोचण्यास दीडेक महिन्याचा कालावधी सहज जातो. या कालावधीत गव्हाचे सगळेच राखीव साठे संपले तर पाकिस्तानी जनतेने खायचे काय, हा प्रश्न तर निर्माण होईलच, पण नागरिकांमध्ये जो असंतोष पसरेल त्याला तोंड कसे द्यायचे याची चिंता पाकिस्तान सरकारला नक्कीच सतावत असेल. आधीच इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानात आर्थिक अराजक पसरले आहे. महागाईने सर्व उच्चांक मोडीत काढल्याने पाकिस्तानी जनतेच्या मनात पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या सरकारविरुद्ध कमालीची चीड निर्माण झाली आहे.
इम्रान खान सरकारची धडपड सुरू
त्यामुळेच पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी गव्हाचा साठा वाढवण्यावर भर दिला आहे. कापून तयार झालेला गहू लवकरात लवकर खरेदी करून तो वेळेत सरकारी गोदामात कसा पोहोचवता येईल. यासाठी इम्रान खान सरकारची धडपड सुरू आहे. येत्या दोन-तीन आठवडय़ांत पाकिस्तानात पिकणारा गहू सरकारी कोठारांपर्यंत पोहोचला नाही तर पाकिस्तानला अभूतपूर्व पेचप्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. देशात तयार होणाऱ्या गव्हाच्या एकूण उत्पादनावर पाकिस्तानी जनतेची भूक भागत नाही. पाकिस्तानच्या कृषी विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षात 2.60 मेट्रिक टन इतकेच गव्हाचे उत्पादन होईल. वर्षभरातील एकूण वापराच्या तुलनेत 30 लाख टनांनी हे उत्पन्न कमी असणार आहे. त्यामुळे गव्हाची आयात करण्याशिवाय पाकिस्तानसमोर दुसरा कुठलाही पर्याय नाही, अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे. (Shivsena Saamana editorial on wheat crisis in Pakistan)
संबंधित बातम्या :
पोलिसांना धमकावल्याप्रकरणी फडणवीस, दरेकरांवर गुन्हा दाखल करा, एसआयटी नेमा; भाई जगताप यांची मागणी