मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे हजरजबाबही आहेत. मोठमोठ्या सभा गाजवतात. आंतरराष्ट्रीय मंचही गाजवून सोडतात. मग स्वतःच्या लोकसभेत (Loksabha)अत्यंत किरकोळ वाटणाऱ्या राहुल गांधी यांच्या प्रश्नांना ते उत्तर का देऊ शकले नाहीत, असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र सामनातून (Samana) करण्यात आला आहे. आता प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. यालाच हुकुमशाही म्हणतात. हा डरपोकपणा आहे, अशी सडकून टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आली आहे. संसदेच्या अधिवेशनात ७ फेब्रुवारी रोजी राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवरून प्रश्न विचारत केंद्र सरकारला धारेवर धारलं. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींविरोधात हक्कभंग नोटीस बजावली आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात खोट्या, अवमानकारक, असंसदीय बाबी मांडल्या असे आरोप राहुल गांधी यांच्याविरोधात करण्यात आले आहेत. गेली सात वर्षे राहुल गांधी हे भाजपच्या खिजगणतीत नव्हते. मात्र आता त्यांनी राहुल नामाचा धसकाच घेतला आहे. राहुल गांधी यांनी ७ फेब्रुवारीच्या भाषणात मोदी सरकारची बोटेच छाटली, ते दुखरे हात तोंडावर ठेवून भाजपवाले बोंबा मारीत आहेत, अशी सणकून टीका सामनातून करण्यात आली आहे.
अदानी मोदी प्रकरणात देशाची नाचक्कीच झाली आहे, भाजप त्याबाबत डोळ्यांवर पट्टी आणि तोंडावर बोट ठेवून आहे. २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर अदानी हे श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचले. फक्त उद्योगपतीच्या पाठिशी पंतप्रधान पूर्ण ताकत कशी काय लावू शकतात, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
राहुल गांधी यांच्या प्रश्नावर अशा तक्रारी आणि नोटिसा फडफडविण्यापेक्षा पंतप्रधान यांनी राहुल गांधींना उत्तर द्यायला हवं होतं. मोदी सभा गाजवतात तर राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तरं का देऊ शकले नाहीत, असा सवाल सामनातून करण्यात आलाय.
अदानी-मोदी संबंधांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमा, अशी विरोधकांची मागणी आहे. ती मान्य केली असती तर पुराव्यांचा भूकंपच झाला असता, पण तसे घडू दिले नाही. आपण एकटे विरोधकांना भारी पडलो, असे पंतप्रधान गरजले. राहुल गांधी यांनी मैदान मारले व भाजपने रडीचा डाव खेळत त्यांना नोटीस बजावली. याला पलायनवाद म्हणतात. पाकिस्तान समोर डरकाळ्या फोडायच्या व लडाखमध्ये घुसलेल्या चीनचे नावही घ्यायचे नाही, त्यातलाच हा प्रकार असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे.