Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजेल, अशी चिन्ह असतानाच काल केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. निवडणूक आयोगाने घेतलेल्या या पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. मात्र महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत. आता यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊतांनी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर न करण्यावरुन जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल चढवला. “महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे. तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा आणखी एक हप्ता महिलांना लाच म्हणून द्यायचा आहे. त्यामुळेच तुम्ही निवडणूक घेत नाही”, असा आरोप संजय राऊतांनी केला.
“नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण करताना छाती पुढे करुन ‘वन नेशन, वन इलेक्शन’ असे सांगितले होते. पण ते चार राज्यातील निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही. झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या फक्त चार राज्यातील निवडणुका जर सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते सरकार वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करत आहे. खोटारडे कुठले, लोकांना मूर्ख बनवत आहेत. महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे. झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे. म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा आहे. त्यामुळे तुम्ही या दोन राज्यातील निवडणुका घ्यायला तयार नाहीत. तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा आणखी एक हप्ता महिलांना लाच म्हणून द्यायचा आहे. त्यामुळेच तुम्ही निवडणूक घेत नाही”, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला.
“वेळेत निवडणुका घ्या. जर तुम्ही वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा करता तर मग सुरुवात करा. या चार राज्यांच्या निवडणुका घ्या, देवेंद्र फडणवीसांनी याबद्दलची मागणी करावी. मोदी लाल किल्ल्यावरुन खोट बोलतात. लाल किल्ल्यावरुन खोटं बोलणारा प्रधानमंत्री. वन नेशन वन इलेक्शन म्हणणारे महाराष्ट्रात निवडणूक घेऊ शकत नाही. झारखंडची निवडणूक घेऊ शकत नाही. चार राज्यांची निवडणूक तुम्ही एकत्र घेऊ शकत नाही आणि वन नेशन वन इलेक्शन म्हणतात”, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. परंतु यंदा दोन्ही राज्यांत वेगवेगळ्या तारखांना मतदान आणि मतमोजणी होणार आहे.