मुंबई : दोन दिवसांआधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी टोला लगावला आहे.देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणणं कठीण जातंय, त्यांना माजी किंवा भावी मुख्यमंत्री म्हणेल, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. “मला तोंडात अजून उपमुख्यमंत्री येत नाही. माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण सतत आपण त्यांना बोलत राहिलो. पण उप हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला जड जात आहे. तरीही मी देवेंद्रजींच्या संदर्भात होत असेल तर त्यांचा हा पक्षाचा प्रश्न आहे. जे मुख्यमंत्रीपदाच्या तयारीत होते. पक्षाची बैठक होते. त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारा असं सांगितलं जातं. जे मुख्यमंत्री झाले ते त्यांचंया मंत्रिमंडळात ज्युनिअर होते. पण भाजपमध्ये शिस्त आणि आदेशाचं पालन केलं जातं. त्यानुसार ते वागले. त्यांचं त्यासाठी कौतुक केलं पाहिजे”, असं राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या फोटोवरही राऊतांनी भाष्य केलंय. “संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. हे एकदा स्पष्ट झाल्यावर असं कोणी करत असेल तर हे त्यांच्या मनात त्यांनी जो गुन्हा केला त्याची खदखद आहे. आपण चुकलोय, आपण गुन्हा केलाय, आपण आपल्या नेत्याला फसवलं. आपण आपल्या शिवसैनिकाला फसवलंय, त्यातून हे सगळं सुरू आहे. लोकांना भ्रमिष्ट केलं जात आहे. ही भाजपची स्टॅटेजी आहे. त्याच पद्धतीने शिवसेनेतून पडलेले लोक तसे करत आहेत. शेवटी या राज्यातील जनता आणि शिवसैनिक दुधखुळे नाहीयेत. पण त्यावर चर्चा न करता नवीन राज्य आलं आहे. नवीन विटी नवीन दांडू… त्यांनी त्याचं काम करावं. महाराष्ट्र आणि मुंबई संदर्भात. भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईची ताकद कमी करायची आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या खांद्यावर त्यांना बंदूक ठेवू दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे राज्यातील जनतेला सांगायला हवं की मुंबईवर शिवसेनेचाच भगवा राहील. पण नाही त्यांना शिवसेनेचा पराभव घडून आणण्यासाठीच मुख्यमंत्री केलं आणि मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. हे हळूहळू स्पष्ट होईल”, असं राऊत म्हणाले आहेत.
“काँग्रेस खूप वेळा फुटली. प्रत्येकजण म्हणतो आम्ही गांधीच्या विचाराचे आहोत. पण मूळ काँग्रेस कोणती आहे. इंदिरा गांधींचीच राहिली ना. इंदिरा गांधीचीच आहे. महाराष्ट्रात चार काँग्रेस आहेत. त्यामुळे अशा बोलण्याला अर्थ नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना आहे. ठाकरे शिवसेना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत”, असं म्हणत राऊतांनी काँग्रेसमधील फुटीवर भाष्य केलंय.