मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी महाराष्ट्रात हालचाली सुरु झाल्या आहेत (President Elections). आगामी राष्ट्रपती निवडणुकीत बिगरभाजप दलाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार हे शरद पवार असावेत, अशी आग्रही भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे (Sanjay Raut). शरद पवार यांनी राष्ट्रपतीपद भूषवावं यासाठी संजय राऊत त्यांची सहमती मिळवण्यासाठी मनधरणी करणार असल्याचीही माहिती आहे (Shivsena Wants Sharad Pawar As President).
लोकसभेत जरी भाजपकडे बहुमत असलं, तरी राज्यसभेत ते नाही. तसेच, देशातील राजकीय स्थिती बदलत असून बिगरभाजपचे राज्य असलेली सरकारे आगामी राष्ट्रपती निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावतील. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, तर निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक मतांचे गणित जुळून येऊ शकते. राष्ट्रपती निवडणुकीसाठी अजून दोन वर्षे अवकाश असताना आतापासूनच संजय राऊत यांची मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
बिगरभाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जाऊन संजय राऊत त्या-त्या पक्षाच्या मुख्यमंत्री आणि नेतृत्त्वांना भेटणार आहेत. जसे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन इत्यादी सर्वांना भेटून संजय राऊत हे शरद पवारांना राष्ट्रपती बनवण्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान केल्यानंतर, आता देशाच्या सर्वात मुख्य पदावर शरद पवार यांना बसवणे हे संजय राऊतांचे पुढील महत्वाचे मिशन असल्याची चर्चा आहे. आता यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे देशाचे गृहमंत्री अमित शाह काय भूमिका घेणार, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Shivsena Wnats Sharad Pawar As President