मुंबई : “नाराजी दूर करण्याचे अनेक मार्ग आहेत. माझ्याकडे विचारणा झाली तर मी पर्याय सांगेन”, असं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Shivsena Senior leader manohar joshi) यांनी सांगितले. महाविकासआघाडी सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून तिन्ही पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. यावर जोशींनी माझ्याकडे (Shivsena Senior leader manohar joshi) अनेक मार्ग असल्याचे म्हटले.
“महाविकासआघाडीचं सरकार बनलं याचा मला आनंद आहे. सध्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. नाराजी दूर करण्याचे अनेक मार्ग आहेत. माझ्याकडे विचारणा झाली तर मी पर्याय सांगेन”, असं मनोहर जोशी यांनी सांगितले.
“जो काम करतो त्याला फळाची अपेक्षा असते. जे नाराज आहेत त्यांना सुद्धा वेगळ्या जागा देऊन त्यांचं समाधान करावं”, असा सल्लाही मनोहर जोशींनी दिला.
जोशी म्हणाले, “पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे या क्षेत्रात पहिल्यांदा आले असले तरी मंत्री म्हणून सुद्धा योग्य काम करतील.
शरद पवारांचं व्यक्तिमत्त्व राष्ट्रपती पदासाठी योग्य आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील”, असं जोशींनी सांगितले.
“जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला चुकीचा आहे. पण एकमेकांवर हत्यार उपसण्याऐवजी जे शत्रू आहेत त्यांच्यावर हत्यार उपसा. यामध्ये सर्व राजकारण केलं जातं आहे. संघटनाचा वापर राजकारणासाठी केला जात आहे”, असा आरोपही जोशींनी केला.