मुंबई : राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो करसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?, असा सवाल विचारत मुळात श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी बांधले जात आहे, असा टोला शिवसेनेने आजच्या (सोमवार) सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लगावला आहे. (Shivsena Slam Bjp through Samana Editorial Over Ram mandir)
“चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024चा निवडणूक प्रचार आहे, अशी टीका करत रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हातरी थांबवायलाच हवा”, असं मत सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.
“अयोध्येतील राममंदिरासाठी संक्रांतीपासून वर्गणीचे काम सुरू होणार आहे. 14 जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीपासून चार लाखांहून अधिक स्वयंसेवक 12 कोटी कुटुंबांशी संपर्क साधतील. हे स्वयंसेवक गावागावांत जातील, असे विश्व हिंदू परिषदेचे चंपतराय यांनी सांगितले. आता या मंदिराच्या निर्माणकार्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची ‘टूम’ काढली ती गंमतीची आहे. चार लाख स्वयंसेवक वर्गणीसाठी दारोदार फिरतील. हे स्वयंसेवक नक्की कोण? त्यांना कोणी नेमले आहे?”, असे सवाल शिवसेनेने विचारले आहेत.
“मंदिरनिर्माणाचा खर्च साधारण 300 कोटींच्या घरात आहे. मुख्यमंत्री योगी यांनी राममंदिर बांधकामात निधीची चिंता करू नये, असे बजावले आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामाचे मंदिर हे देशाच्या अस्मितेचे मंदिर आहे व त्यासाठी जगभरातील हिंदुत्ववाद्यांनी आधीच खजिना रिकामा केला आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करून काय साध्य करणार?”, असा प्रश्नही शिवसेनेने यानिमित्ताने विचारला आहे.
“स्वयंसेवकांची नेमणूक राम मंदिर वर्गणीसाठी झाली असेल तर त्या स्वयंसेवकांची पालक संघटना कोणती, हे स्पष्ट झाले तर बरे होईल. वर्गणीच्या नावाखाली हे चार लाख स्वयंसेवक एखाद्या पक्षाचे राजकीय प्रचारक म्हणून घरोघर जाणार असतील तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल”, असा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे.
मंदिराचा लढा हा राजकीय नव्हता. तो समस्त हिंदू भावनांचा उद्रेक होता. त्याच उद्रेकातून पुढे हिंदुत्वाचा वणवा पेटला व आजचा भाजप त्याच वणव्यावर भाजलेल्या “पोळ्या खात आहे. मंदिरनिर्माणानंतर निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तसे दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरुच आहे. हे राम!”, असं सरतेशेवटी अग्रलेखात म्हटलंय. (Shivsena Slam Bjp through Samana Editorial Over Ram mandir)
संबंधित बातम्या
105 जागा जिंकायचं सोडा, पुढल्यावेळी शिवसेना एवढ्या जागा लढू तरी शकेल का? भाजपने राऊतांना डिवचले
शिवसेना दिलेला शब्द पाळत नाही, एकहाती निर्णय घेते; काँग्रेस नेत्याची खरमरीत टीका