मुंबई : आर्थिक मंदीबाबत कितीही उलटसुलट सांगितलं, तरी सत्याचा कोंबडा आरवला आहे आणि मौनीबाबा डॉ. मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दात सांगितलेल्या सत्याचा स्फोट झाला आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच देशाचं हित आहे, असा सूचक सल्ला शिवसेनेने (Shivsena) ‘सामना’च्या (Saamana) अग्रलेखातून भाजप सरकारला दिला आहे. भारताचा आर्थिक विकास दर (GDP) घसरल्याने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला होता.
‘गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार या पुरताच उरला आहे. त्यातून ‘देशाची व्यवस्था’ नष्ट होत आहे. आर्थिक मंदीचं राजकारण करु नये आणि तज्ज्ञांच्या मदतीने देश सावरावा, असं आवाहन मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केले आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच देशाचं हित आहे’, असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.
अर्थव्यवस्था कोसळली आहे आणि भविष्यात कोसळणार आहे, असं जेव्हा मनमोहन सिंग सांगतात, तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. मोदी पाकिस्तानला धडा शिकवतील, याविषयी शंका नाही, पण अर्थव्यवस्था आणि लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. अर्थव्यवस्थेतील खाचखळग्यांबाबत मनमोहन सिंग बोलत आहेत, असं सामनामध्ये म्हटलं आहे.
‘देशात आर्थिक मंदीमुळे जी भयंकर स्थिती उद्भवली आहे, त्याचं भाकित मनमोहन सिंग यांनी चार वर्षांपूर्वीच केलं होतं. आज जे घडत आहे, ते घडणार असं ‘मि. क्लीन’ मनमोहन यांचं तळमळीचं सांगणं होतं’, असं सामनामध्ये म्हटलं आहे.
‘मनमोहन सिंग यांची तेव्हा यथेच्छ टिंगल-टवाळी करण्यात आली. ‘मनमोहन सिंग हे रेनकोट घालून शॉवरखाली आंघोळ करतात’ असं एक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. म्हणजे मनमोहन सिंग यांना अर्थशास्त्रातलं काहीच कळत नाही, असं नव्या राज्यकर्त्यांना वाटतं. पण त्यांना अर्थशास्त्र आणि देशाचं अर्थकारण कळतं, हे सांगायला आम्हाला संकोट वाटत नाही. देशाचंही तेच मत आहे’ असे खडे बोल सामनातून सुनावण्यात आले आहेत.
काय म्हणाले होते मनमोहन सिंग?
गेल्या तीन महिन्यांपासून जीडीपी दर 5 टक्क्यांवर आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून सरकारच्या बेजबाबदारीपणामुळे निर्माण झाली आहे (Recession), असा दावा मनमोहन सिंग यांनी केला होता. राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करु, असे आवाहनही मनमोहन सिंग यांनी केलं होतं.
भारताकडे अधिक वेगाने विकास करण्याची क्षमता आहे, पण मोदी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे आणि चुकीच्या निर्णयांमुळे परिस्थिती बिघडली आहे. विशेष म्हणजे उत्पादन क्षेत्रातील वृद्धी दर हा 0.6 टक्के आहे. त्यामुळे जीएसटी आणि नोटबंदीमुळे देशात आर्थिक मंदी आली आहे हे स्पष्ट होत असल्याचंही ते म्हणाले होते.