“फडणवीस यांच्या घाणेरड्या राजकारणाचा अंत जवळ आलाय”, संजय राऊत यांची भविष्यवाणी; म्हणाले “आता गाशा…”

| Updated on: Aug 17, 2024 | 11:03 AM

"महाराष्ट्रात ही योजना बंद, ती योजना बंद, हे सूडाचे राजकारण फडणवीसांनी सुरु केले आहे. आम्ही त्या पद्धतीचे राजकर्ते नाहीत", असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

फडणवीस यांच्या घाणेरड्या राजकारणाचा अंत जवळ आलाय, संजय राऊत यांची भविष्यवाणी; म्हणाले आता गाशा...
Follow us on

Sanjay Raut Target Devendra fadnavis : “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून कटकारस्थान करत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी गाशा गुंडाळण्यास सुरुवात करावी. महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवायला तयार नाही. ज्याप्रकारे त्यांनी दळभ्रदी आणि घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात सुरु केलं, त्याचा अंत आता जवळ आलेला आहे”, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत बोलत होते.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी लाडकी बहिण योजनेवरूनही सरकारवर टीका केली. तसेच आगामी निवडणुकांबद्दलही संजय राऊतांनी भाष्य केले.

“हे तिघेही महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल”

“देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्यांचे शेवटच्या काळात राज्य सुरु होतं, त्या पद्धतीने सध्या फडणवीस किंवा त्यांचे लोक काम करत आहेत. सर्व ठिकाणी अनागोंदी, अराजकता, लूटमार हे सर्व सुरु आहे. हे तिघेही घाशिराम कोतवाल आहेत. या तिघांच्या हातात महाराष्ट्र आहे. घाशिराम कोतवालांचा इतिहास काय, हे आम्ही महाराष्ट्राला लवकरच सांगू”, असे संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“सूडाचे राजकारण फडणवीसांनी सुरु केले”

“महाराष्ट्रात हे असे कोण लागून गेलेत की यांनी आणलेल्या योजना या महान योजना आहेत आणि आम्ही त्या बंद करु. महाराष्ट्रावर आम्ही राज्य केलं नाही. या महाराष्ट्राला शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले. गेल्या ७० वर्षात राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले आहेत. या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे, हे जर फडणवीसांना माहिती नसेल तर त्यांनी या राज्याच्या महाराष्ट्राचे महाभारत समजून घ्यावे. या महाराष्ट्रात ही योजना बंद, ती योजना बंद, हे सूडाचे राजकारण फडणवीसांनी सुरु केले आहे. आम्ही त्या पद्धतीचे राजकर्ते नाहीत. त्यांना आपलं सरकार जाईल ही भीती का वाटतं आहे? त्यामुळेच ते लोकांना धमक्या देतात”, असा मोठा आरोपही संजय राऊतांनी केला.

“चांगल्या योजना बंद करण्याची मानसिकता नाही”

“देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून कटकारस्थान करत आहेत आणि महाराष्ट्र ते उघड्या डोळ्याने पाहत आहे. चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाही. चांगल्या योजना बंद करण्याची मानसिकता कोणत्याही नेत्याची किंवा राज्यकर्त्याची नसते. नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेस काळात सुरु असलेल्या योजनांची नावं बदलून त्याच सुरु ठेवल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी नवीन काहीही केलेलं नाही. काँग्रेसच्या काही वर्षानुवर्षे असलेल्या योजनांची फक्त नाव बदलली. योजना त्याच आहेत”, असेही संजय राऊत म्हणाले.

“महाराष्ट्रात सुरु केलेल्या घाणेरड्या राजकारणाचा अंत जवळ”

“त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची सरकार जाणार म्हणून झोप उडाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी गाशा गुंडाळण्यास सुरुवात करावी. महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवायला तयार नाही. ज्याप्रकारे त्यांनी दळभ्रदी आणि घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात सुरु केलं, त्याचा अंत आता जवळ आलेला आहे. मोदी आणि शाहा यांचे बहुमत महाराष्ट्राने गमावले. तो महाराष्ट्र तुम्हाला सत्ता देईल का? अजिबात देणार नाही”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.