नवी दिल्लीः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याविरोधात आज दिल्लीत तीव्र आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रातील ठाकरे गटाच्या खासदारांनी (Shivsena Thackeray MP) संसदेच्या प्रांगणात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जोर-जोरात घोषणाबाजी केली.
बोम्मई को हटादो… भगत सिंह कोश्यारी को हटादो, अशा घोषणा ठाकरे गटाच्या खासदारंनी दिल्या. यावेळी खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत हे उपस्थित होते.
दोन्ही राज्यात भाजपची सत्ता असतानाही हा वाद निर्माण केला जातोय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्यसभेत सीमा प्रश्नाबाबत चर्चा व्हावी अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री जे वक्तव्य करत आहेत, त्याला भाजपचा पाठिंबा आहे, असा खासदार चतुर्वेदी यांचा आरोप आहे. अमित शहा यांना शिंदे गटाचे खासदार भेटतील पण अमित शहा काय करणार आहेत? शहा यांचा पाठिंबा आहे म्हणूनच हा वाद निर्माण झाला आहे, असा आरोप चतुर्वेदी यांनी केलाय. सभागृहात चर्चा झाली नाही तर आम्ही प्रसंगी आंदोलन करू अशा इशारा त्यांनी दिलाय.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्यासह अन्य 8 सदस्यांना श्रद्धांजली वाहून संसदेचं हिवाळी अधिवेशन दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.