हाती मशाल, ठाण्यातून निघाल्या रणरागिणी… मातोश्रीकडे पावलं….

| Updated on: Oct 14, 2022 | 1:59 PM

ऋतुजा लटके यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांचा एवढ्या विक्रमी मतांनी विजय होईल की, विरोधातील उमेदवाराचे डिपॉझिटच जप्त होईल, असा विश्वास महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हाती मशाल, ठाण्यातून निघाल्या रणरागिणी... मातोश्रीकडे पावलं....
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, मुंबईः उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला मशाल (Mashal) हे तात्पुरतं चिन्ह मिळाल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांकडून याचं स्वागत करण्यात येतंय. ठाण्यातील महिला आघाडीनेही मशालीचं स्वागत केलं. एवढंच नव्हे तर शेकडो महिला शिवसैनिकांनी आज हाती मशाल घेत आज मातोश्रीवर (Matoshri) जायचं ठरवलं आहे. ठाण्यातून या महिला नुकत्याच निघाल्या असून भाऊ उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आम्ही निघालो आहोत, असं त्यांनी सांगितलं.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आज ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. नव्या मशाल या चिन्हावर ऋतुजा लटके निवडणूक लढवणार आहेत.

ठाण्यातील शक्तिस्थळावर नमन करून या महिला मुंबईच्या दिशेने निघाल्या आहेत. यात अनिता बिर्जे यांचाही समावेश आहे. आम्ही मशाल या चिन्हाचं पूजन केलं आहे. बंधू, उद्धव ठाकरे यांना सदिच्छा देण्यासाठी आम्ही निघालो आहोत, अशी भावना या महिलांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांरे यांना आमचा पाठींबा आहेच, पण ऋतुजा लटके यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांचा एवढ्या विक्रमी मतांनी विजय होईल की, विरोधातील उमेदवाराचे डिपॉझिटच जप्त होईल, असा विश्वास महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.