मुंबई : “ज्यांनी 2019 मध्ये दिलेला शब्द मोडला. शिवसेनेचा अपमान केला. विकृत शब्दांत माझ्यावर टीका केली आणि आज तुम्ही त्यांच्याचसोबत जाऊन बसलात. हे शोभनीय आहे का?”, असं म्हणत शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाला टोला लगावला आहे. आमच्याबद्दलचं प्रेम हे अडीच वर्ष कुठे गेले होते. जे आमच्याशी अत्यंत वाईट पद्धतीने वागले त्यांना मिठ्या मारताना तुम्हाला आनंद वाटत असेल तर, तुमचा आनंद तुम्हाला लखलाभ असो. मी सर्वसामान्य शिवसैनिकांसोबत आहे, असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत. शिवसेना कुणाची असा सवाल त्यांना विचारण्यात आला तेव्हा शिवसेना आमचीच, असं ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. शिवाय धनुष्यबाण कोणी हिरावू शकत नाही, असंही ठाकरे म्हणालेत. ते मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनेचे चिन्ह हा धनुष्यबाण आहे. यावरच गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवाय 11 जुलै रोजी यासंबंधी न्यायालयात निकाल होणार आहे. पण न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे. शिवाय शिवसेना आणि धनुष्यबाण हे वेगळेच होऊ शकत नाही. कायद्यानुसार धनुष्यबाणाला कोणी हिरावू शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. यासंबंधी आपण अनेक कायदेतज्ञांशी बोललो असल्याचे त्यांनी सांगितले आहे. घटनेनुसार कोणीही धनुष्यबाण हिरावू शकत नसल्याचेही ठाकरे म्हणाले.
दरम्यान, यावेळी शिवसेना ही आपलीच असल्याचा पुनरुच्चारही उद्धव ठाकरेंनी केली. साध्या साध्या माणसांना शिवसेनेनं मोठं केलं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसंच अडीच वर्षांपूर्वी हे सगळं झालं असतं, तर ते सन्मानाने झालं असतं, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय.
शिवसेनेने साध्या माणसांनाही मोठं केले पण ते आज सोडून गेले तर सच्चा शिवसैनिक आजही सोबत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेने आतापर्यंत राजकीय पार्श्वभूमी न पाहता सर्वसामान्यांना मोठे केले आहे. त्यामुळे जे गेले त्यामुळे काही फरक पडणार तर नाहीच पण सर्वसामान्यातून पुन्हा नेतृत्व घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, ह्या एका वाक्यातून उद्धव ठाकरे यांनी अनेक बंडखोरांना टोला लगावला आहे.