मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झालाय. मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. मराठा समाजातील बांधवाना भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झगडणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे अकाली अपघाती झालेले निधन मनाला वेदना देणारे आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयास या दुःखद प्रसंगी मनाला धीर देण्यास बळ देवो, अशा शोकभावना शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) यांनी व्यक्त केल्या आहेत.
विनायकरावांना गेली अनेक वर्ष जवळून पाहण्याचा योग आला , त्यांचा संघर्ष त्यांच्या समाजासाठी तर असायचाच पण त्याच सोबत तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची भूमिका असायची , भाजपसोबत असताना त्यांची गोपीनाथरावांसोबत सतत भेट व्हायची , आपला संघर्ष हा मराठा समाजाला एक दिवस न्याय मिळवून देईल याबाबत त्यांना खात्री होती , महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून नेहमी त्यांच्याशी संवाद होत असे , त्यांची तळमळ आणि शोषितांना न्याय देण्याचा आग्रह , धडपड पाहताना नेहमी त्यांचे कौतुक वाटायचे . अधिवेशन काळात विधिमंडळाच्या आवारात होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये त्यांचा आग्रह कायम विधानपरिषदेत मराठा आरक्षणाबाबत विशेष चर्चा घेण्याचा असे , त्यांच्या अशा अकाली निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे . अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर आपली भावना व्यक्त केली आहे. ते म्हणालेत. ‘एक मोठा शॉक आहे. मराठा समाजासाठी परखडपणे आपली बाजू ते मांडत आले. मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी विधानभवनात आपली बाजू मांडली. मराठा समाजावरील अन्याय सरकारनं दूर करावा, याने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळेल. आजची बातमी ऐकूण मोठा शॉक बसला. वेळोवेळी त्यांनी मला अनेकदा फोन केले होते. कशा पद्धतीनं आपण एकत्र येऊ शकतो, यावर देखील अनेकदा संवाद साधला. छत्रपती घराण्याविषयी त्यांना नेहमी आदर होता, अशी भावना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर आपली भावना व्यक्त केली आहे.