मुंबई : शिवाजी पार्कवर शिवसेनेलाही (Shivsena Party) मेळावा घेण्याची परवानगी मिळू नये याबाबत शिंदे गटाचे सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली होती. शिवसेना शिंदे गटाची हस्तक्षेप याचिका फेटाळली असून ही अंतरीम याचिका होती. सरवणकर यांना याचिका दाखल कऱण्याचा अधिकार नाही असे कोर्टाने म्हणले आहे. तर ठाकरे गटाचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले आहे. त्यामुळे आता शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास ठाकरे गटाला परवानगी मिळणार का हे पहावे लागणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान हे ठाकरे गटाला की शिंदे गटाला हा वाद कोर्टात गेला असून यावर शुक्रवारीच निर्णय येणार असल्याचे सांगितले जात आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावे यासाठी शिवसेनेने 22 आणि 26 ऑगस्ट रोजी महापालिकेकडे अर्ज केले होते. मात्र, पालिकेकडून उत्तर देण्यास दिरंगाई झाली असल्याचा ठपका उच्च न्यायालयाने ठेवलेला आहे.
शिवसेना कोणाची हे अद्याप ठरले नसले तरी आमचाच गट हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता. यावर कोर्टाने शिंदे गटाला चांगलोच फटकारले असून ही सुनावणी केवळ दसरा मेळाव्यासाठी करण्यात आलेल्या अर्जासंबंधी असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यापूर्वी 2016 साली महापालिकेकडून मेळाव्यासाठी रीतसर परवानगी देण्यात आली होती. महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली असल्याने यापूर्वी नेमके काय झाले होते, याची माहिती कोर्टाकडून घेतली जात आहे. शिवाय अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णयही योग्य असल्याचे कोर्टाने सांगितले.
शिवतीर्थ मैदानावर मेळावा घेतल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिकेने दोन्ही गटाची परवानगी नाकारली आहे. शिवाय पालिकेचा निर्णय हा बरोबर असला तरी यापूर्वी परवानगी नेमकी कशाच्या अधारे दिली याचा अभ्यास केला जात आहे.