मुंबई : अंधेरी पोटनिवडणूकीत धक्कादायक ट्विस्ट आला आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. गंभीर आरोप करत त्यांनी थेट निवडणुक रद्द करण्याची मागणी केली आहे. सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे अंधेरी पोट निवडणूक चर्चेत आली आहे. त्यातच आता अपक्ष उमेदवाराच्या तक्रारीमुळे आणखी ट्विस्ट आला आहे.
अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी निवडणुकीतून माघार घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. कांबळे यांच्या या तक्रारीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोट निवडणुक लागली आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.
भाजपचे मुरली पटेल यांना ऋतुजा लटके यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, ऐन वेळी भाजपच्या उमेदवाराने माघार घेतली.
मात्र, ऋतुजा लटके यांच्या विरोधात आणखी सहा उमेदवार निवडणुक लढवत आहेत. मुरजी पटेल यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यामुळे लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
कांबळे यांनी ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरच आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाब आणला असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवर सात दिवसांच्या आत प्रतिसाद न मिळाल्यास न्यायालयात जाणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला आहे. मिलिंद कांबळे यांच्या या तक्रार अर्जावर निवडणूक अयोग्य काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.