मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केलंय. विरोधकांकडे काही प्रश्नच उरले नाहीत. सरकार आल्यापासून लोकहिताचे अनेक निर्णय घेतले जातायत. बाळासाहेबांच्या शिवसेनेत येण्याचा लोकांचा ओढा वाढत चाललाय. त्यामुळे विरोधकांकडे प्रश्नच उरलेले नसल्यानं काहीतरी मुद्दे काढले जात आहेत. अभ्यास करायचा नाही, फक्त बेछूट आरोप करत सुटायचे इतकचं सध्या त्यांचं काम आहे. आरोप करण्यापलीकडे विरोधकांकडे काहीच काम नाहीये, असं श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणालेत.
आज अधिवेशनात बोलणारे उद्धव ठाकरे मागच्या अडीच-तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले असतील. याआधी त्यांना त्याची गरज वाटली नाही. पण आता ते येत आहेत. हा बदल आधीच केला असता तर ही वेळच आली नसती, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत.
सीमावादावरही श्रीकांत शिंदे यांनी आपलं मत मांडलं. सीमाप्रश्नाबाबत सरकार गंभीर आहे. लवकरच याबाबत ठोस पावलं उचलली जातील, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत.
संजय राऊत यांच्यासोबत लोक होते. तेव्हा चांगले होते आणि आता सोडून गेल्यानंतर त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे योग्य नाही. तुमचं नेतृत्व त्यांना मान्य नाही. तुम्ही रोज मनोरंजन नाही तर लोकांची सकाळ खराब करत आहात. तुमची सकाळ खराब आहे, पण लोकांची पण सकाळ खराब करत आहात. लोकांना हे चालणारं नाही, लोकांना विकास हवा आहे. तो विकास आमचं सरकार करतंय, त्यामुळे जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय.