अहमदनगर : छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) याच्या अपात्रेबाबत महासभेने केलेल्या ठरावावर नगरविकास विभागात सुनावणी पूर्ण झाली. नगरविकास राज्यमंत्र्यांसमोर ही सुनावणी करण्यात आली.
महापालिकेच्या तत्कालीन सर्वसाधारण सभेत छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर हा ठराव शासनाकडे निर्णयासाठी पाठवण्यात आला. राज्यमंत्र्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. गेल्या सुनावणीला छिंदमने मुदतवाढीची मागणी केली होती. त्यावर 22 ऑगस्टला पुन्हा सुनावणी घेण्यात आली.
महासभेने ठेवलेले आरोप छिंदमने फेटाळून लावले आहेत. हे प्रकरण न्यायालयात असून, त्यावर निर्णय झालेला नसल्याचं त्याने सांगितलं. छिंदमच्या अपात्रतेच्या ठरवाबाबत नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. छिंदमच्या गेल्या कार्यकाळात महासभेने अपात्र ठरवण्याचा ठराव घेतला होता. मात्र त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत त्याचा विजय झाला आहे.
श्रीपाद छिंदम अहमदनगरमधील प्रभाग क्रमांक नऊमधून तब्बल 1970 मतांनी निवडून आला. छिंदमला एकूण 4532 मतं मिळाली. तर त्याच्या विरोधातील भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांना 2562 मतं मिळाली.
गेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर जिंकून आलेल्या छिंदमला उपमहापौर करण्यात आलं होतं. मात्र शिवरायांविषयी बरळल्यानंतर त्याच्याविरोधात सर्वसामान्यांपासून सर्वच राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवली होती.