सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नितेश राणे आणि निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामकाजावर भाष्य केलंय. 2014 ते 23 पर्यंत मोदीसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताने सुवर्णकाळ अनुभवला. भारताची प्रतिमा आज जगामध्ये महासत्ताक होण्याच्या दिशेने जाणारा देश, संकटकाळात विविध देशांना मदत करणारा देश अशी नवीन ओळख तयार केली आहे, असं नितेश राणे म्हणालेत.
काँग्रेसच्या काळात देशाची एक वेगळी प्रतिमा होती.भ्रष्टाचाराने बरबटलेला देश अशी तेव्हा ओळख होती. ती ओळख आता पुसली गेली आहे. महासत्ताक होण्याच्या दिशेने जाणारा देश अशी ओळख सध्या भारताची होते आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असं नितेश राणे म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, बेरोजगारांना त्यांचा मान देणं,सन्मान देणं हे या सरकारनं केलं आहे. काँग्रेस सरकारच्या काळात योजना जाहीर व्हायच्या पण योजनांचा पैसा लालफितीतच अडकून पडायच्या. आर्थिक समृद्धी दारात आणण्याचं काम मोदी सरकारच्या हातून झालेलं आहे.
2014 च्या अगोदर रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो मच्छीमारांसाठी चुकून प्रस्ताव यायचे. पण आता मुंबई गोवा महामार्गाचा विकास झाला. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येऊ शकले. मुद्रा योजना, पंतप्रधान आवास योजनाचे मोठ्या संख्येने देशात लाभार्थी झाले आहेत
सबका साथ, सबका विकास या घोषणेमुळे धार्मिक स्थळांचा विकास करण्यात आला. ना खाऊंगा ना खाणे दूँगा यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. कोरोना काळात विविध देश संघर्ष करत होते तेव्हा व्हेक्सींन पाठवून देशाला सन्मान मिळवून दिला. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन पंतप्रधान मोदींचा ऑटोग्राफ घेण्यासाठी पुढे आले. जगभरात भारताची प्रतिमा बदलली आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी मोदी सरकारच्या कामकाजावर प्रकाश टाकला.
भाजपच्या या पत्रकार परिषदेत निलेश राणेदेखील उपस्थित होते. त्यांनी विरोधी पक्षावर विशेषत: शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. विरोधी पक्ष एकत्र आले तरी 2024 ला काही फरक पडणार नाही.शरद पवार केंद्रासाठी नेहमी आघाडी करतात. पण काही होत नाही. काँग्रेसमध्ये केंद्रीयमंत्री असताना ही शरद पवारांनी असा प्रयोग केला होता. विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याला गांभीर्याने घेऊ नका, असं निलेश राणे म्हणालेत.