सिंधुदुर्ग : ‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच भाजपचे नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ‘कलंक’च्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
छत्रपतींच्या विरोधात जाऊन सूर्याजी पिसाळ मोगलांना मदत करत होता. आज संजय राऊतच्या रूपाने जन्माला आला आहे. राऊत याने शिवसेनेच्या विरोधात जी भूमिका निभावली. तीच भूमिका पिसाळने छत्रपतींच्या विरोधात निभावली होती. तसंच राऊत प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या राजकारणात करतायेत, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.
कलंकित राजकारणावर बोलताना तुमच्या फॅक्ट्रीत शेणाची खाण आहे. त्याची माहिती पण द्या. कलंकित असलेला तुझ्या मालकाचा मुलगा कलंकित वाटत नाही का?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. उद्धव कलंकीत ठाकरे हे नाव आता तयार झालं आहे. झाकीरचं नाव घेताना तुला लाज वाटली पाहिजे, असंही नितेश राणे म्हणालेत.
नवाब मलिकबाबत तुझं थोबाड उघडलं नाही. दाऊदसोबत नवाबने व्यवहार करून पद्मविभूषण पुरस्कार मिळवला आहे का?, असा सवाल नितेश राणे यांनी संजय राऊतांना विचारला आहे.
उद्धव ठाकरेंची दोन्ही मुलं वाया गेली आहेत. एक दारू खाताना दिसला. तर दुसऱ्यावर हत्येचे आरोप आहेत. म्हणून उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत, असंही राणे म्हणाले.
जातीयवाद आणि धर्मभेद हे कोणी निर्माण केलं? हे जितेंद्र आव्हाड विसरले. खरी राष्ट्रवादी कोणती हे त्यांनी सांगावं, असा टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे.
आमचं काही सुरू असलं तरी जितेंद्र आव्हाड यांचं दुकान बंद झालं आहे. त्यांनी त्याची चिंता करावी, असंही नितेश राणे म्हणालेत.
नितेश राणे यांच्या वक्तव्यावर तृतीयपंथी समाजाने आक्षेप घेतला आहे. पुण्यात ते आंदोलन करत आहेत. अशातच नितेश राणे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
तृतीयपंथी समाजाने माझं वाक्य व्यवस्थित ऐकलं नसेल. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य आहे. त्याचा आधार घेऊन मी बोललो आहे, असं नितेश राणे म्हणाले.
बच्चू कडू हे मंत्रिमंडळ विस्तारावर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्या बोलताना त्यांनी आपली भूमिका पक्षप्रमुखाजवळ मांडावी, असं नितेश राणे म्हणाले.