सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाला धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, भाजपचे सिंधुदुर्ग प्रवक्ते आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काका कुडाळकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काका कुडाळकर शुक्रवारी 21 डिसेंबर रोजी मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काका कुडाळकर रामराम ठोकणार असल्याने भाजपला मोठा फटका बसला आहे. तसंच आता भाजपमधून आऊटगोईंग सुरु होईल, असाही दावा काका कुडाळकर यांनी केला आहे.
विधानसभेच्या 2014 मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळकर यांनी तत्कालीन काँग्रेस नेते नारायण राणे यांची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
काका कुडाळकर यांचा परिचय.
– माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आक्रमक आणि अभ्यासू नेता अशी ओळख.
-मात्र, 2014 च्या निवडणुकीदरम्यान नितेश राणे यांच्याशी वाद झाल्याने, काका कुडाळकर आणि माजी आमदार राजन तेली यांनी एकाच वेळी राणेंपासून फारकत घेतली होती. मात्र, आक्रमक काका कुडाळकर भाजपमध्ये रमले नाहीत.
– काँग्रेसचे अच्छे दिन पाहून काका कुडाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी मुंबईतील गांधी भवन येथे काका कुडाळकर काँग्रेसवासी होणार आहेत.
-काका कुडाळकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणे नक्कीच बदलणार आहेत.