बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी देवेंद्र फडणवीसांसमोरच शिवसैनिकांची घोषणाबाजी

| Updated on: Nov 17, 2019 | 3:12 PM

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी देवेंद्र फडणवीसांसमोरच शिवसैनिकांची घोषणाबाजी
Follow us on

मुंबई : ‘मी पुन्हा येईन’ असा विश्वास व्यक्त करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हुर्यो उडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं होतं. त्यावेळी फडणवीसांसमोरच शिवसैनिकांनी घोषणाबाजी (Slogans against Devendra Fadnavis) केली.

‘आवाज कुणाचा? शिवसेनेचा! सरकार कुणाची? शिवसेनेची!’ अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. फडणवीसांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून जाणं पसंत केलं. शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरु असून महाराष्ट्रात महासेनाआघाडी सरकार स्थापन होणं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

शिवसेनेसोबत संबंध ताणले गेले असताना भाजपकडून कोण नेता स्मृतिस्थळी भेट देणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे, विनोद तावडे यांनी उपस्थिती लावल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला. याआधी फडणवीसांनी ‘बाळासाहेबांनी स्वाभिमान जपल्याचा सल्ला दिला होता’ असा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत शिवसेनेला चिमटे काढले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केलं होतं. भाजप नेत्यांनी ठाकरे कुटुंब किंवा संजय राऊत यांची भेट टाळत त्यानंतर स्मृतिस्थळी हजेरी लावल्याचं दिसलं.

देवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, असं याआधी छगन भुजबळ म्हणाले होते. बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते भाई जगताप यांनीही स्मृतिस्थळाचं दर्शन (Slogans against Devendra Fadnavis) घेतलं.