नवी दिल्ली : ‘रेप इन इंडिया’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पाची खिल्ली उडवल्याने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप खासदारांनी लोकसभेत आवाज उठवला. भाजप खासदार स्मृती इराणी यांच्या नेतृत्वात भाजपच्या महिला खासदारांनी सदनात गोंधळ (Smriti Irani on Rape in India) घातला. त्यानंतर द्रमुकच्या खासदार कनिमोळी राहुल गांधींच्या बचावाला आल्या.
स्मृती इराणींसह भाजपच्या महिला खासदारांनी संसदेत आक्रमक पवित्रा घेतला. ‘रेप इन इंडिया’ असं म्हणत ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पाची खिल्ली उडवण्यात आली. इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे की भारतीय महिलांवर बलात्कार केला जावा, असं वक्तव्य नेता करत आहेत. हा राहुल गांधींचा संदेश देशातील जनतेला आहे का?’ असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महिला खासदारांनी केली. यामध्ये खासदार प्रज्ञासिंहचाही समावेश होता.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
‘भारत देश जगात बलात्काराची राजधानी म्हणून ओळखला जातो. परदेशी राष्ट्रं प्रश्न विचारत आहेत की भारत आपल्या मुली आणि बहिणींचा सांभाळ करण्यात सक्षम का ठरत नाही? उत्तर प्रदेशातील एका भाजपच्या आमदाराने एका महिलेवर बलात्कार केला आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत.’ अशा शब्दात केरळमधील वायनाडमध्ये खासदार राहुल गांधी यांनी टीका केली होती.
‘आता जिकडे बघाल, तिथे रेप इन इंडिया. वर्तमानपत्र उघडा, झारखंडमध्ये महिलेवर बलात्कार, उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदींच्या आमदाराने महिलेवर रेप केला. त्यानंतर गाडीचा अपघात झाला, नरेंद्र मोदी एक शब्दही नाही बोलले. प्रत्येक राज्यात रेप इन इंडिया. नरेंद्र मोदी म्हणाले मुली शिकवा, मुली वाचवा, पण तुम्ही हे नाही सांगितलंत की कोणापासून वाचवायचं आहे. भाजपच्या आमदारांपासून वाचवायचं आहे’ असं राहुल गांधी झारखंडमधील गोडामध्ये बोलले होते.
#WATCH Rahul Gandhi, Congress in Godda, Jharkhand: Narendra Modi had said ‘Make in India’ but nowadays wherever you look, it is ‘Rape in India’. In Uttar Pradesh Narendra Modi’s MLA raped a woman, then she met with an accident but Narendra Modi did not utter a word. (12.12.19) pic.twitter.com/WnXBz8BUBp
— ANI (@ANI) December 13, 2019
कनिमोळींकडून बचाव
द्रमुक पक्षाच्या खासदार कनिमोळी यांनी राहुल गांधी यांचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला. ‘मेक इन इंडिया’, ज्याचा आपण आदर करतो, पण देशात काय होत आहे? राहुल गांधी यांना हेच म्हणायचं होतं. दुर्दैवाने ‘मेक इन इंडिया’ घडतच नाही आणि देशातील महिलांवर बलात्कार होत आहेत. ही एक चिंतेची बाब आहे, असं म्हणत कनिमोळींनी राहुल गांधींची बाजू सावरुन धरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचे पडसाद राज्यसभेतही उमटले होते. गोंधळानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं.
Smriti Irani on Rape in India