मुंबई : संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. त्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. ट्विटरवर मसूद अजहर (#MasoodAzhar) नावाचा हॅशटॅग पहिल्या क्रमांकावर आहे. यात अनेक युजर्स या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करत ‘मोदी है तो मुमकीन है’ म्हणत आहेत. तसेच दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसला ट्रोल केले जात आहे.
भारताने याआधी अनेकदा मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, त्यावेळी चीनने व्हिटो वापरल्याने ही घोषणा होऊ शकली नाही. त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली होती. तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबत झोपाळ्यावर बसणे आणि गळाभेट घेणे यावरही गांधींनी निशाणा साधला होता. याचाच आधार घेत ट्विटवर राहुल गांधींना लक्ष्य केले जात आहे. राहुल गांधींना त्यांच्या जुन्या ट्विट्ससोबत अनेक छायाचित्रे जोडून ट्रोल केले जात आहे.
“आदर्श आचारसंहितेचा भंग”
ट्विटरवर काही युजर्सने उपरोधिकपणे संयुक्त राष्ट्र संघाने ही घोषणा करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा टोमणाही लगावला.
काही युजर्सने आपण मोदींच्या धोरणांचे टीकाकार असतानाही या कामासाठी मोदींचे अभिनंदन करत असल्याचे सांगितले. तसेच मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या कामाचे श्रेय मोदींना द्यायला हवे असे म्हटले.