मुंबई : रस्त्याच्या दूरवस्थेमुळे उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घातल्यामुळे आमदार नितेश राणे सध्या पोलीस कोठडीत आहेत. नितेश राणेंच्या कोठडीनिमित्त सोशल मीडियावर युवासेनेकडून विविध मेसेज शेअर करण्यात येत आहे. युवासेनेच्या मेसेजमध्ये युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे चिखलात उतरुन घाण साफ करताना दिसत आहेत. त्याची तुलना नितेश राणेंनी अधिकाऱ्याला घातलेल्या चिखलाच्या आंघोळीशी केली जात आहे.
युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी फेसबुकवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत एका बाजूला आदित्य ठाकरेंनी मुंबईतील वर्सोव्हा बीचवर चिखलात उतरुन केलेली सफाई, तर दुसऱ्या बाजूला नितेश राणे यांनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना घातलेली चिखलाची आंघोळ दाखवली आहे. या फोटोला “चिखल इथेही आहे, चिखल तिथेही होता, पण तो गजाआड आहे, हा मनाआड’ असं कॅप्शन लिहिलं आहे.
नितेश राणे विरुद्ध आदित्य ठाकरे
नितेश राणे यांचे वडील- खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यात वाद पेटला होता. अनेकवेळा या दोघांमध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काही वर्षांपूर्वी वरळी परिसरात ओव्हरटेक करण्यावरुन नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यात वाद झाला होता. तो पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता. त्यानंतरही नितेश आणि निलेश राणे विरुद्ध आदित्य ठाकरे असा वाद वेळोवेळी पाहायला मिळतो.
आदित्य ठाकरेंकडून वर्सोव्हा बीचची साफसफाई
आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून वर्सोव्हा बीच साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. नुकतंच आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या 500 कार्यकर्त्यांसह वर्सोव्हा बीचची सफाई केली. आदित्य ठाकरेंनी स्वत: जवळपास तीन तास साफसफाई केली. आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातही वर्सोवा किनाऱ्याची सफाई केली होती. त्यानंतर पुन्हा कालच्या रविवारी त्यांनी वर्सोवा बीच स्वच्छता केली. बीचवरील प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, थर्माकोलसह अन्य कचरा स्वत: आदित्य ठाकरेंनी उचलला.
Versova beach clean up… thank you @AUThackeray ji for inspiring us , beach Kaka @AfrozShah1 as kids call him… God be with you !!! assure you shall do my bit for Mother Nature for sure… boss @AUThackeray ji certainly a fruitful Sunday morning… my brother @isiddheshRkadam pic.twitter.com/dJ8pcsI5RT
— Rahul.N.Kanal (@Iamrahulkanal) July 7, 2019
नितेश राणेंकडून उपअभियंत्याला धक्काबुक्की
आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी (4 जुलै) रोजी मुंबई गोवा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे उपअभियंते प्रशांत शेडेकर यांना धक्काबुक्की करत चिखलाची आंघोळ घातली होती. गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पावित्रा घेत उपअभियंत्याला धक्काबुक्की केली. याप्रकरणी शेडेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना 9 जुलैपर्यंत कोठडी सुनावली.