संतोष जाधव, सोलापूरः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बिळातले तत्कालीन मुख्यमंत्री आहेत. आज संविधान दिनी माझी संवाद यात्रा त्यांना होऊ द्यायची नाही. त्यामुळेच माझ्याविरोधात असा हल्ला झाल्याचा आरोप ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी केला. सोलापुरात (Solapur) गुणरत्न सदावर्ते यांनी आयोजित केलेल्या संवाद यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत आज मोठा राडा झाला. संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याने भर पत्रकार परिषदेत सदावर्ते यांच्या अंगावर काळी पावडर फेकली. यानंतर लगेच गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांना संतप्त प्रतिक्रिया दिली.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘ राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी, संजय राऊत.. उद्धव ठाकरे बिळातले तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या पिलावळांना ही संवाद यात्रा सळो की पळो करून सोडली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरील आहे. त्यांना माझा डायलॉग होऊ द्यायचा नाही. म्हणून हे प्रयत्न सुरु आहेत… असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला..
काही लोकांना सोडून आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न आहे. सावरकर जिथे होते, तिथे आम्ही उपवास करून आलेलो माणसं आहोत. आम्हाला या सगळ्या गोष्टी पानी कम चाय आहेत… शरद पवार, अजित पवार यांची आमची कीव येते… संविधान दिनी, संविधान दिनाच्या बाबतीत बोलत असताना, छत्रपती शिवरायांची प्रतिमा माझ्या हातात होती.. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवरही काळी शाई पाडण्यात आली, अशी टीका सदावर्ते यांनी केली.
अशा लोकांना आम्ही घाबरत नाही. त्यांना उत्तर देऊ. उपमुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो, महाराष्ट्रात जे असंवैधानिक वर्तन वाढलंय, याची योग्य वेळी खबरदारी घेतली पाहिजे. संजय राऊत रक्तपाताची भाषा करतात. दोन आठवड्यापूर्वी मला नक्षलवाद्यांची धमकी आली आहे, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
काल उस्मानाबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळीही मराठा संघटनांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात आक्रमक आंदोलन केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाडा आणि स्वतंत्र विदर्भाची मागणी आक्रमकपणे मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेला विविध संघटनांकडून विरोध होत आहे.
आज सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याने त्यांच्या अंगावर काळी पावडर फेकली. तसेच सदावर्ते जिथे जिथे जातील, तिथे असाच निषेध करू, असा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला आहे.