सोलापूर : अॅड. गुणरत्न सदावर्ते हे मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रपिता महात्मा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. महात्मा गांधी यांच्यावर टीका तर नथुराम गोडसेवर स्तुतीसुमनं उधळताना सदावर्ते दिसत आहेत. सदावर्ते यांच्या या वक्तव्यांवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सदावर्ते यांच्यावर देशाद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या सदावर्ते यांच्यावर देशाद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नथुराम गोडसजींचा अखंड भारताचा विचार आम्ही संपू देणार नाही. अखंड भारताचे विचार आणि नथुरामजींच्या विचारांच्या कोणी आड येत असेल तर ते सुपूर्द ए खाक केल्याशिवाय राहणार नाही, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते. त्याला आता काकासाहेब कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांच्यासमोर नतमस्तक होतात. मात्र त्यांच्याच विचारधारेचे गुणरत्न सदावर्ते हे नथुराम गोडसेचा उदो उदो करतात. नथुराम गोडसे याच्या विचारधारेचं समर्थन करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या डोक्यावर परिणाम झाला, असं काकासाहेब कुलकर्णी म्हणालेत.
सदावर्ते हे मनोरुग्ण आहेत आणि त्यांच्यावर चांगल्या डॉक्टर कडून उपचार करणं गरजेचं आहे. गृहमंत्र्यांना आवाहन करतो की तुमचं सदावर्तेंना समर्थन नसेल तर त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करा. देशातील महापुरुषांची जे लोक बदनामी करतील त्यांना तात्काळ जेलमध्ये पाठवलं पाहिजे, असं काकासाहेब कुलकर्णी म्हणालेत.
एकनाथ शिंदे अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा प्रशासनावर विश्वास नाही, असा घणाघातही कुलकर्णी यांनी केला आहे.
राज्याच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री की, जे आढावा घेण्यासाठी पंढरपूरला आले. याचा अर्थ त्यांचा प्रशासनावर आणि मंत्र्यांवर विश्वास नाही. पंढरपुरातील आरोग्य शिबिर म्हणजे ‘हवेत गोळीबार आणि 600 ठार’ असा प्रकार आहे. पंढरपूरच्या आषाढी यात्रेला 14 लाखापेक्षा जास्त वारकरी येत नाहीत. मात्र 20 लाख लोकांचे शिबिर घेणार अशी फसवी जाहिरात सर्व वृत्तपत्रात दिली. जाहिरातीवर पैसा खर्च करण्याऐवजी राज्यातील आरोग्यव्यवस्थेवर हा पैसा खर्च करावा, असंही ते म्हणालेत.
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मागील सहा महिन्यांपासून एमआरआय मशीन बंद आहे. आरोग्यमंत्र्यांचे भाऊ शिवाजी सावंत हे एमआरआय मशीन सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा करतात. त्यामुळे केवळ मार्केटिंग करण्यासाठीचं हे आरोग्य शिबीर आहे, असं टीकास्त्र काकासाहेब कुलकर्णी यांनी डागलं आहे.