सोलापूर : सोलापूर भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केलाय. अशोक निम्बर्गी हे प्रमोद महाजन यांच्यापासून भाजपत कार्यरत होते. मात्र आज त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. तसंच भाजप सोडण्याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.
अशोक निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
भाजपतून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर अशोक निंबर्गी यांनी भाजपवर टीका केली आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये प्रवेश दिला यांचा मला आनंद आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवानी यांच्या विचाराने भारावलेले होतो. पण मागील 7 वर्षांपासून पक्षात एकाधिकारशाही सुरू आहे. त्याला कटाळून मी भाजप पक्षातून बाहेर आलो, असं अशोक निंबर्गी यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना आवाहन केले की, एकदा सत्ता द्या सोलापूरचा कायापालट करतो. मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही. माजी महापौरांना सर्वात जास्त त्रास दिला. मात्र आज तुमची जाहीर माफी मागतो. आताची लोकशाही ही स्क्रिप्टेड लोकशाही आहे. भाजपला दोन खासदार निवडून दिले मात्र ते कधी आले आणि कधी गेले ते कळलंच नाही, असा घणाघात अशोक निंबर्गी यांनी केलाय.
माझी जशी घुसमट होतेय तशीच आजच्या खासदारांच्या मनात घुसमट आहे. त्यांचा निधी खर्च करायची सुविधा या दोन आमदारांनी ठेवलेली नाही. कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाला धक्का लावला त्या प्रत्येक स्वाभिमानाचा हिशोब चुकता करणार आहे, असा इशाराच अशोक निबर्गी यांनी दिला आहे.
सोलापूरमध्ये काँग्रेसच्या निर्धार महामेळावा होतोय. सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये हा महामेळावा होतोय. काँग्रेसचे दिग्गज नेते कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे अस्लम शेख यांच्यासोबतच काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत.