सोलापूर : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. आदित्य ठाकरे यांनी सोलापुरात ‘आदित्य युवा संवाद’ कार्यकमातंर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सोलापुरातील वालचंद कॉलेजमध्ये आदित्य ठाकरेंना एका विद्यार्थ्याने अवघड पण थेट प्रश्न विचारला. खेकड्यामुळे धरण कसं फुटू शकतं, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरेंना जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थित विचारला. या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं.
आदित्य ठाकरे म्हणाले, “एखाद्या ठिकाणी एखादी जागा खेकड्यांनी भुसभुशीत केली असेल तर धरण फुटू शकतं हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे. धरण फुटण्यासाठी अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी एक कारण म्हणजे खेकडे असू शकतात”
आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं त्यावेळी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हे उपस्थित होते. तानाजी सावंत यांनी रत्नागिरीतील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचं विधान केल्याने, त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. राष्ट्रवादीने तर त्यांच्या पुण्यातील घरी खेकडे सोडून दिले होते.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थी जे विविध परीक्षा पास होतात, त्यांना रोजगारासाठी पुणे आणि मुंबईत जावं लागतं. त्यांना IT मधील नोकऱ्या सोलापुरात उपलब्ध व्हाव्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यावेळी आदित्य यांनी अशा कंपन्या सोलापुरात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले.
संबंधित बातम्या
जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरात राष्ट्रवादीने खेकडे सोडले!
भाषणदरम्यान शेतकरी ओरडला, गावात दवाखाना नाही, आदित्य ठाकरे म्हणाले 8 दिवसात सुरु करतो!