सोलापूर : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. आमच्यासाठी ते अदखलपात्र आहेत. त्याच्या प्रत्येक वक्तव्यावर भाष्य करावं असं नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. बिहारमधील पाटन्यामध्ये विरोधकांची बैठक झाली. त्यावरही विखे पाटलांनी टीका केली आहे.
विरोधकांनी कितीही एकजुट केली तरीदेखील या एकीला लवकरच तडे जातील. विरोधकांची एकजुट म्हणजे शिळ्या कडीला उत आणण्याचं प्रकार आहे.यापूर्वी देखील असे प्रयोग झाले आहेत. मात्र या प्रयोगाला जनता कदापि फसणार नाही, असं म्हणत विरोधी पक्षांच्या बैठकीवर विखे पाटलांनी टीका केली आहे.
वज्रमुठी सभेत स्टेजवर कुणी कुठे बसावं.कुणी कधी भाषण करावं यावरून महाविकास आघाडीत भांडणं झाली.भांडणं करणारी ही लोकं राज्य कसं चालवतील? आता वज्रमूठीला तडे गेले आहेत. अजित पवारांनी काय निर्णय घ्यावा तो त्यांचा निर्णय आहे. त्यांना काय सांगायची काय आवश्यकता नाही, असंही ते म्हणालेत.
देशाच्या 15 विरोधी पक्षांची काल बिहारमधील पाटन्यात एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर दीर्घ चर्चा झाली. यावर विखे पाटलांनी टीका केलीय.
BRS पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवायला सुरूवात केली आहे. के चंद्रशेखर राव हे विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होणर असल्याचंही बोललं जात आहे. पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायला कुणाची परवानगी लागत नाही. के.सी राव म्हणून भक्त येत असतील तर त्यांनी यावं, असं विखे पाटील म्हणालेत.
600रुपये ब्रासच्या वाळूच्या निर्णयाला गती मिळत नाही. हे मला मान्य आहे. एका महिन्याच्या आत राज्यात 700 वाळू डेपो सुरु करणार आहोत. अधिकाऱ्यांनी निष्क्रियता दाखवल्यास विभागीय आयुक्त थेट कारवाई करतील. जमीन तुकडा बंदीचा गुठ्ठेवारीचा निर्णय घेण्याचं धोरण अंतिम टप्यात आला आहे. 10 जुलैपर्यंत निर्णय समोर येईल, असं विखे पाटलांनी सांगितलं आहे.