सोलापूर : सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय भूकंप घडविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे आणि एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख हे दोघेही राष्ट्रवादीचे वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही नेत्यांचे पक्षप्रवेशामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी ताकद मिळणार आहे. तर काँग्रेस, शिवसेना, आणि बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या वाटेवर असणाऱ्या महेश कोठेचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Solpur Shivsena and MIM leader May Join NCP)
महेश कोठे हे सध्या शिवसेनेत असून काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेले स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांचे ते चिरंजीव आहेत. कोठे यांनी 2014 मध्ये काँग्रेसला रामराम करत सोलापुरातील शहर मध्य मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. तर 2019 मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्याने शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करत शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती.
त्यामुळे महेश कोठे हे काँग्रेस, शिवसेना करत आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आमदारकीचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी गेल्या दीड महिन्यापासून ते राष्ट्रवादी नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती.
तर दुसरीकडे एमआयएमचे तौफिक शेख राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. या दोघांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीची महानगरपालिकेतील आणि पक्ष संघटनेची ताकद वाढणार असल्याचं राजकीय अभ्यासकांकडून बोलले जात आहे. त्यासाठी रणनीतीही आखली जात आहे.
तौफिक शेख यांनीही सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंविरोधात निवडणूक लढवली होती. यात प्रणिती शिंदे आणि तौफीक शेख यांच्यात चांगली लढत झाली होती. सोलापूर शहर मध्य हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. 2014 ला झालेल्या पराभवाचा वचपा करण्यासाठी तौफिक शेख यांनी यंदाच्या विधानसभेसाठी तयारी केली होती. (Solpur Shivsena and MIM leader May Join NCP)
मात्र कर्नाटकातील काँग्रेस नेत्या रेश्मा पडकनूर यांच्या खुनाच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यामुळे त्यांना यंदाची विधानसभा निवडणूक लढविता आली नाही. त्यांना तुरुंगातूनच शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएमकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे होते. मात्र ऐनवेळी पक्षाने फारुक शादी यांना निवडणूक रिंगणात उतरवले.
सोलापूर शहरातील तीन जागांपैकी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हे आघाडीच्या वाटेत राष्ट्रवादीकडे आहे. मात्र भाजपचा वळ म्हणून ओळखल्या जाणार्या या मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला विजयाची आघाडी घेता आलेली नाही. यंदा राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस यांनी आघाडी करत सत्तेत आरुढ झाले आहेत.
मात्र येत्या काळात शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ ढासळण्याची राष्ट्रवादीची रणनीती सुरु आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात असलेल्या मोठ्या प्रमाणातील मुस्लिम मते आणि एमआयएमची असलेली ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस हेरणार आहे.
संबंधित बातम्या :
नवी मुंबईत हाथरस घटनेच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे पाण्यात उतरुन सत्याग्रह आंदोलन
दानवे किती रस्त्यावर असतात, हे माहीत आहे, बाळासाहेब थोरातांचा टोला