नवी दिल्ली: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) चौथ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी आज संसदेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी राऊत भावूक झाले होते. मी चौथ्यांदा शपथ घेतोय. यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे आशिर्वाद आहेत. मी त्यांच्याबरोबर काम केलंय. संजय राऊत राज्यसभेत पोहोचू नये यासाठी खूप प्रयत्न केले गेले. यात स्वकीयांचा हात आहे का नाही पाहा. पण उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा माझ्यावर विश्वास आहे. आदित्य ठाकरे (aaditya thackeray) लहान आहेत. पण त्यांचही माझ्यावर प्रेम आहे. आता मला पॉइंटेड केलं जातंय करू द्या, असं संजय राऊत म्हणाले. खासदार. आमदार गेल्यानं काही फरक पडणार नाही. लाखो शिवसैनिक आमच्या पाठीशी आहेत. त्यांच्या बळावर आम्ही पुन्हा उभं राहू, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.
कोर्टात 16 आमदारांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. जो कायदा आहे, नियम आहे त्यावर आम्हाला अपेक्षा आहे. कोण काय म्हणतं ते विचारू नका. दोन जणांच मंत्रिमंडळ आहे. एवढा मोठा गट, एवढा मोठा भाजपा. मग तरीही का झालं नाही मंत्रिमंडळ स्थापन? त्याचं कारण म्हणजे त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. कायद्याचा पेच आहे. म्हणून सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, असा दावा राऊत यांनी केला.
दरम्यान, संसद भवनात शिवसेना खासदारांची बैठक सुरू होत आहे. बैठकीला सगळ्या खासदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीत विनायक राऊत करणार मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेचे संसदेतील मुख्य प्रतोद राजन विचारे हे या बैठकीसाठी शिवसेना खासदारांना व्हीप बजावणार आहेत. त्यामुळे शिवसेना खासदार उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएच्या उमेदवाराला मतदान करणार का?, असा सवाल केला जात आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही सर्वोच्च न्यायालयावर विश्वास दाखवला आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात अपात्र आमदरांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. शिवसेनेचा व्हीप सर्वोच्च न्यायालयात ग्राह्य धरला जाईल. 40 आमदार अपात्र ठरतील. महाराष्ट्रात संविधानाचा चुराडा केला जातोय. दुर्दैवाने काही मंडळी राजभवन मध्ये बसली आहेत. हे औटघटकेचं सरकार आहे, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.