भंडाराः आपला नेता (Leader)शब्दाला जागणारा असावा, अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते. पण फार कमी नेते निवडणुकांदरम्यान (Election) दिलेली आश्वासनं पाळतात. आपला शब्द खरा करून दाखवतात. अनेकांना तर प्रचारादरम्यान, आपण काय काय बोललो हेही आठवत नाही. त्यामुळे नेत्यांची आश्वासनं कितपत मनावर घ्यायची, अशी स्थिती गावा-गावांत निर्माण झाली आहे.
लोकांची मनं जाणणाऱ्या एका महिला नेत्याने यावर उत्तम तोडगा काढलाय. त्या निवडणुकीत उतरल्यात, मतदारांना शब्दही दिलाय आणि तो खरा करून दाखवणार, यासाठी एक पुरावाही दिलाय.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या धुरळ्यात भंडाऱ्याच्या एका ग्रामपंचायतीची यासाठीच चर्चा आहे. इथल्या महिला सरपंचाने जाहिरनामा दिलाय तो १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर…
येत्या 18 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सोमनाळा गावातील सरपंच पदाच्या महिला उमेदवार छबु वंजारी यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा नवा फंडा वापरला आहे.
या नेत्याचं शिक्षणही चांगलंच झालंय. बी एस्सी,एम एस डब्लू.. .येत्या 18 डिसेंबर ला होणाऱ्या 8 सदस्यीय (7+1) सोमनाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात त्यांनी उडी घेतली आहे.
गावात स्थानिक पातळी वरील दिग्गज स्थानिक नेते आहेत. 1200 लोकसंख्या असलेल्या मतदारांना आपण वेगळं काय द्यायचं, याचा विचार त्यांनी केला. अन् जाहिरनामा 100 रूपयांच्या स्टैम्प पेपर वर लिहून दिला आहे..
छबू ताई एवढ्यावर थांबल्या नाहीत… त्यांनी चक्क त्याला नोटरी करत शासकीय अधिकृतता मिळवून दिली आहे. हा जाहिरनामा दोन पानांचा आहे.
आपण निवडून आलो तर जाहिरनामा खरा करून दाखवणं आपल्याला बंधनकारक असणार असल्याचं या ताई सांगत आहेत.
या जाहिरनाम्यातील आश्वासनं फक्त आपणच नाही तर संपूर्ण पॅनलकडून पाळली जातील, असंही छबूताईंनी म्हटलंय. गावकऱ्यांना हा नोटरी केलेला जाहिरनामा आकर्षित करत आहे. पहिल्यांदा असा जाहिरनामा पहिल्याचे गावकरी सांगत आहेत. निवडणूक प्रचाराच्या बदलत्या स्वरूपाचं कौतुकही गावकरी करीत आहेत.