रायपूर : भाजपचा (BJP) सर्वात कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाच्या गोटातून मोठी बातमी आहे. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचं 85 वं महाअधिवेशन सध्या छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे सुरु आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी या अधिवेशनात उपस्थित आहेत. सोनिया गांधी आज अधिवेशनात हजर राहिल्या. केंद्र सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. केंद्र सरकारने देशातील केंद्रीय यंत्रणांचा ताबा मिळवला आहे. आजपर्यंत भारतात काँग्रेसने लोकशाही मजबूत केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून लोकशाहीची मूल्ये जपण्यास मदत झाली. मात्र भारत जोडो यात्रा हाच माझ्या राजकीय जीवनातील अखेरचा टप्पा असू शकतो, असं वक्तव्य सोनिया गांधी यांनी केलंय.
काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं कौतुक केलं. या यात्रेमुळे काँग्रेस आणि जनतेचं एक नातं पुन्हा एकदा जिवंत झाल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात आपण चांगलं सरकार दिलं होतं. पण भाजपच्या काळात सध्या काँग्रेससमोर अनेक आव्हानं आहेत, याची जाणीव सोनिया गांधी यांनी करून दिली. दलित, अल्पसंख्यांक, महिलांवर अत्याचार होत आहेत. पण सरकार केवळ काही उद्योगपतींच्या पाठिशी उभे आहे. हे सांगतानाच सोनिया गांधी म्हणाल्या, भारत जोडो यात्रेनंतर माझी राजकीय कारकीर्द संपुष्यात येऊ शकते. काँग्रेससाठी हा एक यशस्वी टप्पा मानला जाईल.
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या, कठीण आव्हानांना पार करत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा पूर्ण केली. जनतेशी काँग्रेसशी पुन्हा एकदा नातं सजीव केलं. आता काँग्रेसनेही कंबर कसली आहे. देश वाचवण्यासाठी आपण अखेरपर्यंत लढणार आहोत. कणखर कार्यकर्ता हीच काँग्रेसची ताकद आहे. शिस्तीत काम करणे हीच पक्षाची गरज आहे. आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल. वैयक्तिक हित बाजूला ठेवून त्याग करण्याची गरज आहे. पक्षाचा विजय हाच देशाचा विजय ठरेल. मल्लिकार्जून खरगे यांच्या नेतृत्वात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.