मुंबई : समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाने काँग्रेसला बाजूला सारत उत्तर प्रदेशात युती केली. यानंतर आता सपा आणि बसपा महाराष्ट्रातही काँग्रेसही डोकेदुखी वाढवणार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमची साथ आहे. त्यातच सपा-बसपाच्या एंट्रीमुळे मुस्लीम मतांचं विभाजन होणार आहे, ज्याचा सर्वात मोठा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला बसेल, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
सपा-बसपा महाराष्ट्रात सर्व जागा लढणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आलंय. लवकरच जागावाटपही जाहीर होईल. त्यातच वंचित बहुजन आघाडीही सर्व जागा लढणार आहे. काँग्रेस आमदारांच्या मते, मुस्लीम मतदार काँग्रेसच्याच बाजूने असतील. पण राजकीय विश्लेषकांच्या मते, सपा आणि बसपामुळे सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसणार आहे, ज्यामुळे शिवसेना-भाजप युतीला फायदा होईल.
महाराष्ट्रात काँग्रेसने सपाला आणि एमआयएमला सोबत घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. सपासाठी नकार दिला नसला, तरी जागा सोडण्यासाठी काँग्रेस अनुत्सूक होती. त्यामुळे सपा आणि बसपाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरुन सूत्र फिसकटल्यामुळे वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्वच्या सर्व जागा स्वतंत्र लढणार आहे.
देशातील सर्वात मोठं राज्य आणि सर्वात जास्त जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाने युती केली आहे. विशेष म्हणजे यातून काँग्रेसला बाजूला ठेवलंय. अमेठी आणि रायबरेली, जिथे अनुक्रमे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी लढणार आहेत, त्या दोन मतदारसंघांमध्ये सपा आणि बसपा उमेदवार देणार नाही.